महाराष्ट्रातील किती रेल्वे स्थानकांचे होणार नूतनीकरण?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 2 Years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

विरोधकांवर नकारात्मक राजकारणाचा आरोप करत सध्या संपूर्ण देश भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाविरुद्ध ‘भारत छोडो’चा नारा देत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या भूमिपूजन समारंभानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांनी संबोधित केले. २४,४७० कोटी रुपये खर्चून या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात असून, महाराष्ट्रातील ४४ स्थानकांच्या विकासासाठी दीड हजार कोटी देण्यात आले आहेत.

‘स्वत:ही काम करायचे नाही आणि दुसऱ्यांनाही करू द्यायचे नाही, या तत्त्वावर विरोधक काम करत आहेत’ असा आरोपही पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले की, ‘संसदेची आधुनिक इमारत बांधण्यात आली असून विरोधक या इमारतीलाही विरोध करत आहेत. प्रत्यक्षात संसदेची ही इमारत सरकार तसेच विरोधी पक्षांचेही प्रतिनिधित्व करते. विरोधकांनी या इमारतीप्रमाणे कर्तव्यपथाच्या विकासालाही विरोध केला.’

‘गेल्या ७० वर्षांत विरोधकांनी साधे युद्ध स्मारकही उभारले नाही मात्र आम्ही ते उभारले तेव्हा त्याला विरोध करायलाही विरोधकांना शरम वाटली नाही. गुजराथमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ हा जगातील सर्वांत मोठा पुतळा असून सर्व भारतीयांना त्याचा अभिमान आहे. काही पक्षांना देशाच्या या पहिल्या केंद्रीय गृहमंत्र्यांची निवडणुकीवेळी आठवण होते. मात्र, त्यांचा एकही मोठा नेता पटेलांच्या पुतळ्याला आदरांजली वाहण्यासाठी जात नाही,’’ असा टोलाही पंतप्रधानांनी लगावला.

विरोधी पक्षांवर नकारात्मक राजकारणाचा आरोप करत मोदी म्हणाले, ‘की आम्ही नकारात्मक राजकारणापासून दूर जात पक्षीय राजकारण किंवा मतपेढीचा विचार न करता देशाच्या विकासाचे ध्येय हाती घेतले.’ ‘भारत छोडो’च्या नऊ ऑगस्ट रोजीच्या वर्धापनदिनाचा उल्लेख करत ते म्हणाले, ‘हा ऐतिहासिक दिन असून देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत या दिनाने नवीन ऊर्जा निर्माण केली.

याच धर्तीवर आज संपूर्ण देश दुष्प्रवृत्ती, भ्रष्टाचार, घराणेशाही व तुष्टीकरणाच्या विरुद्ध ‘भारत छोडो’चा नारा देत आहे.’’ आगामी फाळणीच्या स्मृतीदिनाचा उल्लेख करत या धक्क्यातून सावरत लोकांनी देशाच्या विकासात योगदान दिले. हा दिवस आपल्याला आपली एकता अबाधित ठेवण्याची आठवण देतो.

आपला स्वातंत्र्यदिन म्हणजे आपल्या देशाची प्रगती व राष्ट्रध्वजाप्रतिच्या निष्ठेचा पुनरुच्चार करण्याचा दिवस आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी देशातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकाविला गेला पाहिजे, असे आवाहनही मोदींनी केले. ‘एकेकाळी वार्षिक दोन लाख रुपये उत्पन्नावर कर आकारल्या जाणाऱ्या आपल्या देशात आता दैनंदिन सात लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. तरीही सातत्याने वाढणारा प्राप्तिकर देशातील मध्यमवर्गीयांची व्याप्ती सातत्याने वाढत असल्याचा स्पष्ट संदेश देत आहे’, असेही ते म्हणाले.

पुनर्विकास होणाऱ्या स्थानकांची संख्या
उत्तर प्रदेश - ५५
राजस्थान - ५५
बिहार - ४९
महाराष्ट्र - ४४
प. बंगाल - ३७
मध्य प्रदेश - ३४
आसाम - ३२
ओडिशा - २५
पंजाब - २२
गुजरात - २१
तेलंगण - २१
झारखंड – २०

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले कि, “केंद्र सरकार १० लाख युवकांना ‘रोजगार मेळाव्या’च्या माध्यमातून नोकरी पुरविण्याची मोहीम राबवीत आहे. हे बदलत्या भारताचे चित्र असून त्यातून युवकांना नवीन संधी मिळत आहेत आणि युवक देशाच्या विकासाला नवीन पंख देत आहेत.”