आज 'या' भागात अतिवृष्टीचा इशारा

Story by  आवाज़ मराठी | Published by  sameer shaikh • 1 Years ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

देशभरासह अनेक राज्यांमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. तर राज्यात पुणे, मुंबईसह अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाचा जोर दिसून येत आहे. राज्यात पुढील ४८ तासांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आजही पुणे मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबईसह पुण्यामध्ये वातावरण ढगाळ राहील. मुंबईच्या काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राज्याच्या अनेक भागात काल (रविवारी) मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुण्यासह आसपासच्या भागांमध्ये पावसाचा जोर दिसून आला.

यंदा मान्सूनमध्ये देशात सरासरीच्या ९४% पाऊस झाला आहे. तर राज्यात सरासरीच्या ९७% पाऊस झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, हिंगोली, जालना, अकोला, अमरावती, बीड या नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी नोंदवण्यात आले आहे.