परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी
भारत आणि चीनमधील संबंध सामान्य करण्यासाठी प्रत्यक्ष ताबा रेषा (LAC) स्थिर असणे अत्यंत आवश्यक आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे. सीमेवरील कोणत्याही प्रकारच्या Disturbances मुळे द्विपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलताना त्यांनी दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीचा विस्तार सीमेवरील शांततेशी जोडला.
चीनशी सामान्य संबंध हवे असतील आणि इतर क्षेत्रांत प्रगती करायची असेल, तर सीमेवर शांतता आणि स्थैर्य असणे ही सरळ आणि साधी गोष्ट असल्याचे जयशंकर यांनी नमूद केले. २०२४ पासून एलएसीवरील परिस्थिती बऱ्यापैकी पूर्वपदावर आली असून, संबंधही हळूहळू सामान्य होत असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वेकडील लडाखमधील साडेचार वर्षांहून अधिक काळ चाललेला लष्करी पेचप्रसंग संपल्यानंतर दोन्ही बाजूंनी अनेक विश्वास-निर्माण करणारे उपाय (Confidence-building measures) राबवले आहेत.
आर्थिक मुद्द्यांवर भाष्य
चीनसोबतच्या आर्थिक मुद्द्यांवर बोलताना जयशंकर यांनी व्यापारी तूट (Trade Balance) पूर्णपणे चीनच्या बाजूने झुकलेली असल्याची खंत व्यक्त केली. जगातील इतर देशांसोबत भारताने उत्तम कामगिरी केली असली, तरी चीनमध्ये भारतीय क्षेत्रांना समान बाजारपेठ आणि सुलभ संधी (Level Playing Field) मिळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२०२० मधील गलवान खोऱ्यातील संघर्षाची आठवण करून देत ते म्हणाले की, १९७५ ते २०२० या ४५ वर्षांच्या काळात सीमेवर एकही बळी गेला नव्हता आणि यादरम्यान भारत-चीन संबंधांत वाढ झाली होती. मात्र, २०२० मध्ये कोविड लॉकडाऊनच्या काळात झालेल्या संघर्षामुळे या संबंधांना मोठा धक्का बसला. सीमेवर शांतता भंग झाल्यास त्याचे परिणाम कसे होतात, हे गेल्या काही वर्षांत स्पष्टपणे दिसून आले असल्याचे परराष्ट्र मंत्र्यांनी शेवटी सांगितले.