IND-BANGLADESH: बांगलादेशसोबत परस्पर हितावर आधारित सकारात्मक संबंध हवेत: परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 5 h ago
भारत-बांगलादेश संबंधांवर परराष्ट्र मंत्रालयाचे मोठे विधान; ऊर्जा संकट आणि सुरक्षेवरही भाष्य
भारत-बांगलादेश संबंधांवर परराष्ट्र मंत्रालयाचे मोठे विधान; ऊर्जा संकट आणि सुरक्षेवरही भाष्य

 

नवी दिल्ली 

बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांच्या नवी दिल्लीतील संभाव्य दौऱ्याबद्दल अनिर्चितता असतानाच, भारताने मंगळवारी स्पष्ट केले की, परस्पर हितसंबंध आणि परस्पर सहकार्याच्या आधारावर ढाकासोबत "सकारात्मक आणि रचनात्मक" संबंध ठेवण्यास देश इच्छुक आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आपल्या द्विसाप्ताहिक पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी ५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत घेतलेल्या आभासी पत्रकार परिषदेनंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला होता. हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी बांगलादेशने पुन्हा केली असून ती रहमान यांच्या संभाव्य भारत भेटीशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. यावर बोलताना जयस्वाल म्हणाले की, "बांगलादेशसोबत परस्पर हिताच्या आधारावर सकारात्मक, रचनात्मक आणि पुढचा विचार करणारे संबंध असावेत, अशी भारताची इच्छा आहे."

ऊर्जा संकट आणि सुरक्षा सहकार्य

माजी पंतस्रधानांच्या पत्रकार परिषदेबाबत भारताने यापूर्वीच आपण या कार्यक्रमात कोणतीही भूमिका बजावली नाही आणि त्यांच्या वक्तव्यांचे समर्थनही करत नाही, असे स्पष्ट केले होते. तसेच प्रत्यार्पणाच्या मागणीबाबत बोलताना, हे अर्ज आमच्या स्थापित प्रक्रियेनुसार तपासले जात आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. बांगलादेशमधील तीव्र ऊर्जा संकटावर भारताकडे करण्यात आलेल्या मदतीच्या अतिरिक्त विनंतीवर बोलताना, भारताच्या स्वतःच्या गरजा, शुद्धीकरण क्षमता (Refining Capacity) आणि उपलब्धतेनुसार यावर विचार केला जात असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले. याशिवाय, अद्याप अंतिम करार न झालेल्या तिस्ता नदीच्या पाणीवाटपाबाबतचे सर्व विषय संयुक्त नदी आयोगामार्फत (Joint Rivers Commission) हाताळले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवी दिल्लीत येत्या १२ आणि १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक ब्रिक्स शिखर परिषदेत विविध जागतिक आव्हानांवर सखोल चर्चा अपेक्षित आहे.