INDIA-CHINA BORDER: द्विपक्षीय संबंध सुरळीत राहण्यासाठी LAC वर शांतता आवश्यक: परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्ट भूमिका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 4 h ago
सीमेवर शांतता राखणे अत्यंत महत्त्वाचे; परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्ट भूमिका
सीमेवर शांतता राखणे अत्यंत महत्त्वाचे; परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्ट भूमिका

 

नवी दिल्ली

भारत आणि चीनमधील सीमा भागातील घडामोडी अत्यंत गंभीर असून, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) शांतता आणि सुव्यवस्था राखणे हेच द्विपक्षीय संबंधांचे भविष्य ठरवेल, असे स्पष्ट मत भारताने व्यक्त केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, सीमेवरील तणाव आणि शांततेची स्थिती दोन्ही देशांच्या व्यापक संबंधांवर थेट प्रभाव टाकत असते.

अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबनसिरी भागात चिनी सैन्याच्या आक्रमक हालचालींच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाने ही भूमिका मांडली आहे. तसेच भारताने अरुणाचल प्रदेशमधील २७ ठिकाणांना त्यांची प्रमाणित नावे देण्याच्या निर्णयावर चीनने घेतलेल्या आक्षेपाची फेटाळणी केली. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि या वास्तवाला कोणीही बदलू शकत नाही, असे भारताने ठणकावून सांगितले आहे.

राजनैतिक आणि लष्करी पातळीवर संवाद सुरू

भारत आणि चीनने नुकत्याच पार पडलेल्या ३६ व्या 'वर्किंग मॅकेनिज्म फॉर कन्सल्टेशन अँड कोऑर्डिनेशन ऑन इंडिया-चीन बॉर्डर अफेअर्स' (WMCC) बैठकीत सीमाभागातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. द्विपक्षीय संबंधांच्या विकासासाठी सीमेवर शांतता राखणे ही प्राथमिक अट असल्याचे भारताने या बैठकीतही स्पष्ट केले. दोन्ही देश लष्करी आणि राजनैतिक मार्गांनी समस्या सोडवण्यासाठी संपर्कात आहेत.