श्रीलंकेच्या मदतीवरून राजकारण नको; भारताने पाकिस्तानला सुनावले खडे बोल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 9 h ago
भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल
भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल

 

चक्रीवादळाने ग्रासलेल्या श्रीलंकेला मदत सामग्री पाठवण्यासाठी भारताने आपल्या हवाई हद्दीचा वापर करण्यास नकार दिला, हा पाकिस्तानचा दावा भारताने मंगळवारी (२ डिसेंबर) फेटाळून लावला आहे. भारताने पाकिस्तानचे हे विधान हास्यास्पद आणि पायाहीन असल्याचे सांगत त्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. भारताची बदनामी करण्यासाठी पाकिस्तानने पुन्हा एकदा चुकीच्या माहितीचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

नेमकं काय घडलं? 

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने असा आरोप केला होता की, श्रीलंकेला मानवतावादी मदत पाठवण्यासाठी भारताने त्यांच्या विमानाला हवाई हद्दीचा वापर करण्यास परवानगी नाकारली किंवा त्यात विलंब केला. याला उत्तर देताना भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी वस्तुस्थिती मांडली. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानने १ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता भारतीय उच्चायुक्तालयाकडे हवाई हद्दीच्या वापरासाठी विनंती केली होती.

केवळ ४ तासांत दिली परवानगी श्रीलंकेतील परिस्थिती आणि मदतीची तातडीची गरज लक्षात घेऊन भारत सरकारने अत्यंत वेगाने हालचाली केल्या. त्याच दिवशी, म्हणजे १ डिसेंबरलाच संध्याकाळी ५:३० वाजता भारताने पाकिस्तानच्या विमानाला परवानगी दिली. अवघ्या साडेचार तासांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे पाकिस्तानचा ६० तास वाट पाहावी लागल्याचा दावा पूर्णपणे खोटा ठरतो.

विशेष म्हणजे, पाकिस्तानने भारतीय विमानांना आपल्या हवाई हद्दीतून जाण्यास बंदी घातलेली आहे. असे असूनही, भारताने राजकीय मतभेद बाजूला ठेवून केवळ मानवतावादी दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला. पाकिस्तानचे विमान श्रीलंकेतील पूरग्रस्तांसाठी मदत घेऊन जाणार होते, त्यामुळे भारताने अडवणूक करण्याचे काहीच कारण नव्हते.

पाकिस्तानचा कांगावा पाकिस्तानने दावा केला होता की, भारताच्या असहकार्यामुळे त्यांच्या मदतकार्यात अडथळे येत आहेत. तसेच भारताने ४८ तासांनंतर दिलेली परवानगी ऑपरेशनल दृष्टिकोनातून अव्यवहार्य होती, असाही सूर त्यांनी लावला होता. मात्र, भारताने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे हे निवेदन म्हणजे भारतविरोधी अपप्रचाराचाच एक भाग असल्याचे भारताने सुनावले आहे.

श्रीलंका सध्या 'दितवाह' चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या भीषण परिस्थितीशी सामना करत आहे. तेथे पूर आणि भूस्खलनामुळे ४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा कठीण काळात भारत श्रीलंकेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि 'ऑपरेशन सागर बंधू' अंतर्गत मदतकार्य करत आहे, असेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.