पीओकेमधील जनतेवर दडपशाही; पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांची भारताकडून निंदा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या विधानांचे खंडन
परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या विधानांचे खंडन

 

नवी दिल्ली 

जम्मू-काश्मीरबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हे विधान म्हणजे पाकिस्तानच्या स्वतःच्या अपयशावर पांघरूण घालण्याचा एक हताश प्रयत्न असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे.

ख्वाजा आसिफ यांनी भारतावर सिंधू पाणी करार आणि जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीबाबत टीका केली होती. याला उत्तर देताना जयस्वाल म्हणाले, "आम्ही यासंदर्भातील काही रिपोर्ट पाहिले आहेत. पाकिस्तानने केलेले हे दावे आम्ही पूर्णपणे नाकारतो आणि अशा बनावट दाव्यांकडे आम्ही दुर्लक्ष करतो."

पीओकेमधील परिस्थितीवर भारताचे भाष्य

परराष्ट्र मंत्रालयाने पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) सध्याच्या आंदोलनांवरही भाष्य केले आहे. "पीओकेमध्ये सध्या जे काही सुरू आहे, ते पाकिस्तानच्या अनेक दशकांच्या आर्थिक शोषणाचे आणि मूलभूत अधिकारांच्या नाकारण्याचे थेट परिणाम आहेत. पाकिस्तानने अनधिकृतपणे ताबा मिळवलेल्या या भागात प्रशासकीय दडपशाहीचा कळस गाठला आहे," असे जयस्वाल यांनी नमूद केले.

पाकिस्तान सरकारने या आंदोलनांना अत्यंत क्रूरपणे हाताळले असून, अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा रोखणे, इंटरनेट सेवा बंद करणे आणि निशस्त्र नागरिकांवर प्राणघातक बळाचा वापर करणे, असे प्रकार तिथे सुरू असल्याचे भारताने स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानच्या या कृत्यांचा आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा जाब विचारावा, अशी अपेक्षाही भारताने व्यक्त केली आहे.