भारताच्या खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधातील कारवाईला वेग

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
एनआयए
एनआयए

 

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात मोहिम सुरू केली आहे. एनआयएने नुकतेच अनेक गँगस्टर्स आणि खलिस्तानी दहशतवाद्यांचे फोटो आणि नावे जारी केली आहेत. तपास यंत्रणेने लोकांकडून त्यांच्या मालमत्ता आणि व्यवसायांची माहिती मागवली आहे. एवढेच नाही तर, NIA ने व्हॉट्सॲप नंबर जारी करून या गुन्हेगारांच्या बेनामी मालमत्तेशी संबंधित माहिती देणाऱ्यांना बक्षीसही जाहीर केले आहे.

प्रकरण काय आहे?
एएनआयने अतिरेकी-गँगस्टर नेटवर्कशी जोडल्या गेलेल्या लोकांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. तसेच नागरिकांना या लोकांच्या नावावर असलेल्या मालमत्ता आणि व्यवसायांची माहिती असल्यास ताबडतोब एनआयएला कळवण्यास सांगण्यात आले आहे. या लोकांचे सहकारी, मित्र आणि नातेवाईक यांच्या नावावर काही संपत्ती असेल तर त्याचीही माहिती दिली जाऊ शकते, असेही तपास यंत्रणेने म्हटले आहे. यासाठी NIA ने व्हॉट्सॲप नंबर देखील जारी केला आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. ट्रू़डो यांच्या या वक्तव्यानंतर कॅनडा आणि भारत यांच्यात तणाव वाढला आहे. १८ जून रोजी ब्रिटीश कोलंबियामधील सरे येथील गुरुद्वाराबाहेर निज्जर या खलिस्तान दहशतवाद्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान या घडामोडींच्या पार्श्वभूमिवार आता एनआयएने ही यादी जारी केली आहे.

जारी केलेल्या फोटो आणि नावांच्या यादीतल अनेक जण देशातून फरार झाले असून त्यांना परदेशात राहून येथे दहशत पसरवत असल्याचे एनआयएने म्हटले आहे. एनआयएने जारी केलेल्या फोटोमध्ये भारतातून फरार झालेल्या आणि खलिस्तानी दहशतवाद्यांच्या सहकार्याने भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या काही टॉप मोस्ट गँगस्टर्सची नावे आणि फोटोंचा समावेश आहे. त्यापैकी बरेच जण अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये राहातात.

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्तेवरून भारत आणि कॅनडायांच्यात सुरू असलेल्या राजनैतिक वादाच्या पार्श्वभूमीवर एनआयएने भारतात सक्रिय असलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाईची घोषणा केली आहे. भारतात बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या (बीकेआय) दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या दोन लिस्टेड दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. हरविंदर सिंग संधू (उर्फ रिंदा) आणि लखबीर सिंग संधू (उर्फ लांडा) अशी आरोपींची नावे आहेत.

एनआयएने परमिंदर सिंग कायरा (उर्फ पट्टू), सतनाम सिंग (उर्फ सतबीर सिंग, ऊर्फ सत्ता) आणि यदविंदर सिंग (ऊर्फ यड्डा) या इतर तीन साथीदारांची माहिती देणाऱ्यास प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. भारताची शांतता आणि सांप्रदायिक सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने तसेच पंजाबमध्ये दहशत पसरवण्याच्या उद्देशाने बीकेआयच्या दहशतवादी कारवायांसंदर्भात एनआयएने दाखल केलेल्या खटल्यात यांचा शोध सुरू आहे.

 

पंजाबमध्ये दहशतवादी शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांची तस्करी करून बीकेआय या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेसाठी निधी गोळा केल्याचा आरोप या दहशतवाद्यांवर आहे. तसेच व्यापारी आणि प्रतिष्ठित व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल केल्याचाही यांच्यावर आरोप असून पंजाब राज्यात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने टार्गेट किलिंग आणि सरकारी यंत्रणांवरील हल्ल्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये त्यांचा समावेश आहे.


एनआयएच्या तपासात असे समोर आले आहे की या दहशतवाद्यांनी पैशांचे आमिष दाखवून बीकेआयसाठी नवीन सदस्यांची भरती केली आहे. भारतातील विविध भागात दहशतवादी कारवाया करण्यासाठी त्यांनी विविध देशांमध्ये एक ऑपरेटिव्ह नेटवर्क ही स्थापन केले आहे.