नवी दिल्ली
पाकिस्तानने सीमापार दहशतवादाच्या आरोपांना फेटाळून लावल्यानंतर, भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा, विशेषतः सीमापार दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारत पूर्णपणे वचनबद्ध असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.
दहशतवादाच्या विरोधातील लढा भारत अत्यंत गांभीर्याने घेत असल्याचे जयस्वाल यांनी आपल्या द्विसाप्ताहिक पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. "दहशतवादाचा भारताला मोठा फटका बसला आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही दहशतवादाचा, विशेषतः सीमापार दहशतवादाचा सामना करण्यासाठी जागतिक स्तरावर सहकार्य मिळवण्याचे आणि आपली कारवाई मजबूत करण्याचे प्रयत्न केले आहेत. दहशतवादाचे संकट नष्ट करण्यासाठी जी काही कारवाई करणे आवश्यक आहे, ती भारत करत राहील," असे त्यांनी नमूद केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी माहिती दिली होती की, स्वातंत्र्यदिनापूर्वी १४ राज्यांमध्ये राबवण्यात आलेल्या समन्वित मोहिमेत ISI समर्थित 'शाहजाद भट्टी नेटवर्क'च्या २०० हून अधिक ऑपरेटरना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत आयईडी, ग्रेनेड्स आणि हेरगिरीसाठी वापरले जाणारे सीसीटीव्ही कॅमेरे जप्त करण्यात आले होते. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे आरोप फेटाळून लावत भारतावर देशांतर्गत सुरक्षेवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. याला उत्तर देताना भारताने आपली भूमिका ठाम असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले.
याच पत्रकार परिषदेत बोलताना रणधीर जयस्वाल यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) गंभीर परिस्थितीवरही भाष्य केले. "तिथल्या लोकांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांकडून होणारी कारवाई आणि अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर आलेली बंधने यामुळे परिस्थिती चिंताजनक आहे. तिथल्या जनतेला आता आंतरराष्ट्रीय समुदायाची सहानुभूती आणि पाठिंब्याची गरज आहे," असे त्यांनी म्हटले आहे.