जम्मूचा पर्यटन विभागाच्या प्रयत्नामुळे पुढील वर्षीच्या सुरुवातीला व्यावसायिक पॅराग्लायडिंग सुरू होणार असून त्यामुळे या प्रदेशाला नवीन ओळख मिळू शकते. व्यावसायिक पॅराम्लायडिंगचे प्रशिक्षण दिलेल्या २० जणांच्या तुकडीचे नेतृत्व यातील एकमेव महिला डॉली शर्मा करत आहेत. हा प्रकल्प म्हणजे धैर्य, सशक्तीकरणाचीही कहाणी आहे.
जम्मूजवळ असलेले एथम हे पॅराग्लायडिंगचे ठिकाण असून येथे सध्या व्यावसायिक पॅराग्लायडिंगच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. पॅराग्लायडिंगसाठीचा टेक-ऑफ पॉईंट जम्मू शहरापासून १९ किमीवर असून सारधान ओढ्याच्या कडेला असलेल्या वाळूच्या प्रदेशात लैंडिंग झोन आहे. पॅराग्लायडिंगच्या २० जणांच्या तुकडीच्या सहा दिवसांचे प्रशिक्षणाच्या समारोप सत्रात जम्मूच्या पर्यटन विभागाचे सहसंचालक एझाझ कैसर म्हणाले, की पॅराग्लायडिंगसाठी शिफारस केलेले एथम हे एकमेव ठिकाण आहे. येत्या पाच-सहा महिन्यांत व चालू आर्थिक वर्ष संपण्याच्या आत येथून व्यावसायिक पॅराग्लायडरना भरारी घेता येईल.
राष्ट्रीय गिर्यारोहण संस्थेतून २० जणांनी यापूर्वीच 'पी१', 'पीर' आणि 'पी३' हे संबंधित अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. त्यांच्यासाठी सहा दिवसांच्या प्रगत प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. हे सर्वजण हिमाचल प्रदेशातील विलासपूर (गोविंद सागर सरोवर) व बिर-बिलिंग येथे 'पी ४' हा प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करतील. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर २० जणांकडून नियमित पॅराग्लायडिंग करून घेतले जाईल.
जम्मू पर्यटन विभागाचे सहसंचालक एझाझ कैसर म्हणाले की, "सुमारे १९० चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या एथम परिसरात उड्डाणासाठी योग्य उतार, सातत्यपूर्ण वाऱ्याची परिस्थिती आणि निसर्गरम्य दृश्ये पाहता येत असल्याने तो पॅराग्लायडिंगसाठी आदर्श मानला जात आहे. रेस्टॉरंट, सनसेट पॉईंट व योगा प्लॅटफॉर्मसारख्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आम्ही ही जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे."
महिला पॅराग्लायडर डॉली शर्मा यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, "व्यावसायिक वाढीसह जम्मूतील महिलांनाही पुढचे पाऊल टाकण्याची संधी मिळाली आहे. महिला अबला नसून ती सर्व काही करू शकते. साहसी पर्यटन पर्यटकांना आकर्षित करेल तसेच युवक, विशेषतः महिलांनाही नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळेल."