मुंबईतील ७२ वर्षीय व्यावसायिकाला तब्बल ४ वर्षे सुरू असलेल्या ट्रेडिंग घोटाळ्यात ३५ कोटी रुपयांचा फटका बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माटुंगा (पश्चिम) येथील रहिवासी भरत हरकचंद शाह यांनी ग्लोब कॅपिटल मार्केट्स लिमिटेड या ब्रोकरेज कंपनीने त्यांच्या पत्नीच्या नावाने असलेल्या खात्यातून परवानगीशिवाय व्यवहार केल्याचा आरोप केला आहे.
शाह हे परळ येथे कर्करोगग्रस्त रूग्णांसाठी कमी भाड्याच्या गेस्टहाऊसचे संचालन करतात. त्यांच्या वडिलांच्या १९८४ मधील निधनानंतर त्यांना शेअर्सचा पोर्टफोलिओ वारशाने मिळाला. मात्र, शेअर बाजाराविषयी काहीही माहिती नसल्यामुळे शाह दांपत्याने कधी सक्रियपणे शेअर बाजारात व्यवहार केला नव्हता.
तक्रारीनुसार, ही फसवणूक २०२० मध्ये सुरू झाली. एका मित्राच्या सल्ल्यानंतर शाह यांनी स्वतःचे आणि पत्नीचे डिमॅट व ट्रेडिंग खाते ग्लोब कॅपिटल मार्केट्स लिमिटेडकडे उघडले आणि वारशाने मिळालेल्या शेअर्सचे हस्तांतरण या कंपनीकडे केले. सुरुवातीला कंपनीशी संवाद सहज होता. कंपनीच्या प्रतिनिधींनी नियमित संपर्क साधून, अतिरिक्त गुंतवणुकीची गरज भासणार नाही आणि विद्यमान शेअर्स तारण ठेवून सुरक्षितपणे ट्रेडिंग करता येईल, अशा अनेक आश्वासनांची मालिका दिली.
कंपनीच्या प्रतिनिधींनी शाह यांना सांगितले की त्यांना “पर्सनल गाईड” नेमले जातील. या नावाखाली अक्षय बारिया आणि करण सिरोया हे दोन कर्मचारी त्यांच्या पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करण्यासाठी नेमण्यात आले. यानंतर या दोघांनी शाह आणि त्यांच्या पत्नीच्या खात्यांवर पूर्ण नियंत्रण मिळवले. एफआयआरनुसार, या दोन प्रतिनिधींनी सुरुवातीला रोज फोन करून कोणते ऑर्डर द्यायचे ते सांगितले. काही दिवसांनी त्यांनी शाह यांच्या घरी येणे-जाणे सुरू केले आणि स्वतःच्या लॅपटॉपवरून ई-मेल पाठवणे सुरू केले.
शाह यांच्या मते, त्यांना हळूहळू सर्व आवश्यक माहिती देण्यास भाग पाडले गेले. त्यांनी प्रत्येक वेळचा ओटीपी टाकला, आलेल्या प्रत्येक एसएमएस आणि ई-मेलला त्यांनी उत्तर दिले. कंपनीकडून त्यांना फक्त ‘गरजेपुरती’ माहिती दिली जात होती. प्रत्यक्षात कंपनीने त्यांच्या खात्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले होते. मार्च २०२० ते जून २०२४ या काळात शाह यांना दरवर्षी मिळालेल्या स्टेटमेंटमध्ये सतत “नफा” दाखवला गेला. स्वच्छ आणि नफ्यातील स्टेटमेंट पाहून शाह यांना काहीच गैर वाटले नाही.
जुलै २०२४ मध्ये ग्लोब कॅपिटलच्या ‘रिस्क मॅनेजमेंट डिपार्टमेंट’कडून आलेल्या एका अचानक फोनमुळे संपूर्ण फसवणूक उघडकीस आली. “तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या खात्यात ३५ कोटी रुपयांचे डेबिट बॅलन्स आहे. ते तात्काळ भरले नाही तर तुमचे शेअर्स विकले जातील,” असा इशारा फोनवर देण्यात आला. कंपनीच्या कार्यालयात गेले असता शाह यांना कळले की त्यांच्या खात्यांतून मोठ्या प्रमाणावर परवानगीशिवाय ट्रेडिंग करण्यात आले. कोट्यवधींचे शेअर्स विकले गेले होते आणि ‘सर्क्युलर ट्रेड्स’ (समान पक्षांदरम्यान केलेले व्यवहार) करून खाते प्रचंड तोट्यात ढकलले गेले.
उरलेली मालमत्ता गमावण्याचा धोका समोर असताना शाह यांनी अनिच्छेने उरलेले शेअर्स विकले आणि संपूर्ण ३५ कोटींचा डेबिट परतफेड केला. नंतर उरलेले शेअर्स त्यांनी दुसऱ्या कंपनीकडे हलवले. यानंतर त्यांनी ग्लोबच्या वेबसाइटवरून मूळ, सविस्तर ट्रेडिंग स्टेटमेंट डाउनलोड केले आणि ई-मेलद्वारे मिळालेल्या “नफा” दाखवणाऱ्या स्टेटमेंटशी तुलना केली. त्यातून मोठ्या तफावती उघड झाल्या.
तसेच शाह यांना नंतर समजले की नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) या कंपनीला अनेक नोटिसा पाठवल्या होत्या. या सर्व नोटिसांना कंपनीने शाह यांच्या नावाने उत्तर दिले, पण त्यांना याची कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. प्रत्यक्ष ट्रेडिंग इतिहास आणि त्यांना दाखवण्यात आलेले स्टेटमेंट यांत जमीन–अस्मानाचा फरक होता. “चार वर्षे कंपनीने आम्हाला खोटी चित्र दाखवली आणि पाठीमागे तोटा वाढत गेला,” असे शाह यांनी म्हटले आहे.
शाह यांनी हा प्रकार “सांगून–करून केलेली आर्थिक फसवणूक” असल्याचे म्हटले. त्यांनी वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. भारतीय दंड विधानातील कलम ४०९ (विश्वासघात) आणि ४२० (फसवणूक) यांसह इतर कलमांखाली केस नोंदवण्यात आली असून तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) सोपवण्यात आला आहे.