“ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानसह चीन, तुर्कियेचाही सामना केला”, अशी माहिती भारताचे उप-लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल सिंग यांनी शुक्रवारी दिली. ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानच्या पाठिशी चीन आणि तुर्कियेचा हात असल्याचे त्यांनी म्हटले.
शुक्रवारी दिल्ली येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत असताना राहुल सिंह म्हणाले, “पश्चिम भारताच्या सीमेवर भारत एका शत्रूशी लढत होता. मात्र वास्तवात भारत तीन शत्रूंना तोंड देत होता. आपल्यासमोर सीमेवर पाकिस्तान होता. मात्र चीनकडून त्यांना मदत दिली जात होती.”
फिक्कीने आयोजित केलेल्या ‘न्यू एज मिलिटरी टेक्नॉलॉजीज’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी पाकिस्तान, चीन आणि तुर्कीला भारताच्या उत्तर सीमेवरील तीन शत्रू म्हणून संबोधले. त्यांनी सांगितले की, चीन सर्व प्रकारची मदत करत आहे. चीन उत्तर सीमेला आपल्या पाकिस्तानला दिलेल्या शस्त्रास्त्रांची चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा म्हणून वापरत आहे. याशिवाय, चीन आपल्या ३६ युक्त्यांचा वापर करत आहे. यातून शत्रूला परदेशी तलवारीने मारण्याचा आणि शेजाऱ्याचा वापर करून त्रास देण्याचा डाव आहे.
लेफ्टनंट जनरल सिंग म्हणाले की, "तुर्कीनेही पाकिस्तानला बायरक्तार ड्रोन, इतर अनेक ड्रोन आणि प्रशिक्षित व्यक्ती पुरवून मोठी भूमिका निभावली आहे. पाकिस्तान हा फक्त चेहरा आहे, त्यांना चीन सर्व प्रकारची मदत करत आहे. कारण गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी दाखवते की, पाकिस्तानने खरेदी केलेल्या ८१ टक्के लष्करी साहित्य हे चिनी आहे."
ते पुढे म्हणाले की, “चीनचा जुना सिद्धांत आहे, परदेशी तलवारीने मारणे. त्यांना उत्तर सीमेवर स्वतः न अडकता शेजाऱ्याचा वापर करून त्रास द्यायचा आहे. चीनला आपली शस्त्रास्त्रे इतर शस्त्र प्रणालींविरुद्ध तपासण्याची संधी मिळत आहे. ही सीमा त्यांच्यासाठी थेट प्रयोगशाळा आहे."
त्यांनी सांगितले की, C4ISR (कमांड, कंट्रोल, कम्युनिकेशन्स, कॉम्प्युटर्स, इंटेलिजन्स, सर्व्हेलन्स आणि रीकॉनिसन्स) आणि नागरी-लष्करी एकीकरणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. यात अजून खूप काम करायचे आहे. ते म्हणाले, “DGMO स्तरावरील चर्चा सुरू असताना, पाकिस्तानने सांगितले की, त्यांना माहिती आहे की तुमची अमुक एक यंत्रणा तयार आहे. त्यांनी ती मागे घेण्याची विनंती केली. याचा अर्थ, त्यांना चीनकडून थेट माहिती मिळत होती.” भारताला या क्षेत्रात वेगाने प्रगती करावी लागेल आणि योग्य पावले उचलावी लागतील, असेही ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान लोकसंख्येच्या केंद्रांचा विचार झाला नाही, पण त्यासाठी तयारी करावी लागेल. ते म्हणाले, “यासाठी अधिक हवाई संरक्षण, रॉकेट-विरोधी यंत्रणा, तोफखाना आणि ड्रोन-विरोधी यंत्रणा तयार कराव्या लागतील. यासाठी आपल्याला खूप वेगाने काम करावे लागेल.हा एक सततचा खेळ आहे, आपल्याला यात सतर्क राहावे लागेल,” असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, इस्रायलसारखी सुखसोय भारताकडे नाही, ज्याने आयर्न डोम आणि इतर हवाई संरक्षण यंत्रणा तैनात केल्या आहेत. “आपल्याकडे ती सुखसोय नाही, कारण देश विशाल आहे आणि अशा गोष्टींसाठी खूप खर्च येतो,” असे ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या नेतृत्वाने दिलेला स्पष्ट धोरणात्मक संदेश, असे त्यांनी सांगितले. “तुम्ही आमच्या सीमा ओलांडल्या, तर कारवाई होईल. गरज पडली तर दंडात्मक कारवाई होईल. काही वर्षांपूर्वीप्रमाणे दुखणे सहन करण्याची वेळ आता नाही. हा एक महत्त्वाचा संदेश आहे, जो स्पष्टपणे समोर आला आहे.”
त्यांनी सांगितले की, लक्ष्यांची निवड आणि नियोजन हे मोठ्या प्रमाणात माहितीवर आधारित होते. “तंत्रज्ञान आणि मानवी गुप्तचर यांच्या साहाय्याने माहिती गोळा केली गेली. एकूण २१ लक्ष्ये निश्चित केली गेली, त्यापैकी नऊ लक्ष्यांवर हल्ला करणे योग्य ठरेल, असे ठरवले गेले. अंतिम निर्णय शेवटच्या दिवशी किंवा शेवटच्या तासात घेण्यात आला की, या नऊ लक्ष्यांवर हल्ला करायचा. तिन्ही सैन्यदलांनी एकत्रितपणे काम करून आपण एक एकीकृत शक्ती आहोत, हा संदेश देण्याचा विचारपूर्वक निर्णय घेतला गेला. सेना, नौदल आणि हवाईदल यांनी आपापली भूमिका निभावली,” असे ते म्हणाले.