भारताने दहशतवादाविरुद्ध लढाईला निर्णायक वळण देत ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत मोठी कारवाई केली. भारतीय वायुसेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील ९ दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले केले. ही कारवाई पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली. २२ एप्रिल २०२५ ला झालेल्या या हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला होता.
मध्यरात्रीनंतर अचूक हल्ले
भारतीय वायुसेनेने मंगळवारी मध्यरात्रीनंतर १:४४ वाजता ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. बहावलपूर, कोटली, मुजफ्फराबाद, मुरिदके, अहमदपूर शर्किया, बाग, भिवर, गुलपूर आणि सियालकोटजवळील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. हे हल्ले अत्यंत नियोजनबद्ध आणि अचूक होते. भारतीय संरक्षण मंत्रालयाने सांगितले की ही कारवाई रणनीतीनुसार आखली गेली होती.
दहशतवादी तळांचा खात्मा
या हल्ल्यांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले. यापैकी चार जैश-ए-मोहम्मद, तीन लष्कर-ए-तोयबा आणि दोन हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित होते. बहावलपूर हे जैश-ए-मोहम्मदचे प्रमुख केंद्र आहे. या ठिकाणी जैशचा म्होरक्या मसूद अझहर याच्या मदरशांचाही नाश झाला. हाफिज सईद यांच्याशी संबंधित काही केंद्रेही नष्ट झाल्याचे सांगितले जाते. या तळांवरून भारताविरुद्ध हल्ल्यांचे कट आखले जात होते, असे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.
पंतप्रधानांचा रात्रभर पाठपुरावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्रभर युद्धकक्षातून या कारवाईचा पाठपुरावा केला. पंतप्रधान कार्यालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या समन्वयाने या मोहिमेला अंतिम स्वरूप देण्यात आले. भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने सांगितले की ‘ऑपरेशन सिंदूर’चा उद्देश सीमेपलीकडून सक्रिय दहशतवादी गटांना स्पष्ट इशारा देणे आणि त्यांच्या हालचालींना ठोस प्रत्युत्तर देणे हा होता.
संरक्षण मंत्रालयाचे निवेदन
संरक्षण मंत्रालयाने पहाटे निवेदन प्रसिद्ध करत सांगितले, "काही वेळापूर्वी भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करण्यात आले. या ठिकाणांवरून भारतावर हल्ले आखले जात होते आणि त्याची अंमलबजावणी होत होती. एकूण नऊ तळांना लक्ष्य करण्यात आले. ही कारवाई केंद्रित, मोजूनमापून केलेली आहे. ती तणाव वाढवणारी नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.”
त्यात पुढे म्हटले आहे कि, “कोणतेही पाकिस्तानी लष्करी तळ हल्ल्याचे लक्ष्य नव्हते. भारताने संयम दाखवत केवळ दहशतवादी तळांवरच हल्ला केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही पावले उचलण्यात आली. या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना उत्तरदायी ठरवण्याचे वचन आम्ही पूर्ण करत आहोत."
भारतीय सेनेचा संदेश
हल्ल्यानंतर भारतीय सेनेने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर संदेश दिला: "न्याय दिला! जय हिंद!!" या कारवाईने दहशतवाद्यांना कठोर इशारा दिला आहे. भारतीय सेनेने हल्ल्यापूर्वी ‘रेडी टू स्ट्राइक, ट्रेंड टू विन’ नावाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. यात सैन्याची तयारी आणि ताकद दाखवण्यात आली होती.
देशांतर्गत पाठिंबा
भारतातील सर्वच राजकीय पक्षांनी या कारवाईला पाठिंबा दिला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले: "आम्हाला भारतीय सशस्त्र दलांचा अभिमान आहे. त्यांनी पाकिस्तान आणि PoK मधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले." AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि RJD नेते तेजस्वी यादव यांनीही सेनेचे कौतुक केले. बॉलिवूडमधील रितेश देशमुख, निम्रत कौर, मधुर भांडारकर आणि परेश रावल यांनी सेनेचे अभिनंदन केले.
आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया
संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी भारत आणि पाकिस्तानला संयम राखण्याचे आवाहन केले. दोन्ही देशांनी लष्करी कारवाया टाळाव्यात, असे त्यांनी सांगितले. भारताने अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि सौदी अरेबिया यांसारख्या देशांना या कारवाईची माहिती दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकार परिषदेची घोषणा
भारत सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेची घोषणा केली. ही परिषद सकाळी १०:३० वाजता नवी दिल्लीतील राष्ट्रीय माध्यम केंद्रात होणार आहे. PIB च्या फेसबुक आणि यूट्यूबवर ही परिषद थेट पाहता येईल.
विमानसेवेवर परिणाम
या कारवाईनंतर उत्तर भारतातील अनेक विमानतळांवरील उड्डाणांवर परिणाम झाला. श्रीनगर, जम्मू, अमृतसर, लेह, चंदीगड आणि धर्मशाला विमानतळांवर उड्डाणे प्रभावित झाली. अनेक विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या आहेत.