पॅलेस्टाईन राजदूताची भारताकडे मोठी मागणी; गाझामध्ये कृत्रिम अवयव केंद्र स्थापन करण्याची विनंती

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 6 h ago
नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना पॅलेस्टाईनचे भारतातील राजदूत अब्दुल्ला एम. अबू शावेश
नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना पॅलेस्टाईनचे भारतातील राजदूत अब्दुल्ला एम. अबू शावेश

 

नवी दिल्ली

भारताने कबूल केलेलं कृत्रिम अवयव केंद्र गाझामध्ये स्थापन करावं, अशी विनंती पॅलेस्टाईनने भारताला केलीय. नुकत्याच झालेल्या युद्धानंतर तिथे ५००० हून अधिक अपंगांना कृत्रिम अवयवांची मोठी गरज आहे. भारतातले पॅलेस्टिनी राजदूत अब्दुल्ला एम. अबू शावेश यांनी ही माहिती दिली. पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँकमध्ये विशेष रुग्णालयाच्या बांधकामाची योजना दोन्ही देशांनी अंतिम केलीय, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

 

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राजदूत म्हणाले, "पॅलेस्टाईनमध्ये भारताच्या मदतीने बांधल्या जाणाऱ्या रुग्णालयाच्या संदर्भात काल भारत आणि पॅलेस्टाईनने सर्व कागदपत्रं अंतिम केली आहेत." काम करायला वेस्ट बँक हा तुलनेने शांत परिसर आहे. तिथेच कृत्रिम अवयव केंद्र स्थापन करायला भारत पसंती देईल, अशी भीती पॅलेस्टाईनला वाटतेय. म्हणूनच त्यांनी या केंद्राच्या जागेवर मोठा भर दिलाय.

"या संदर्भात भारताची भूमिका स्पष्ट आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी करायला ते पूर्णपणे सज्ज आहेत. हे केंद्र गाझामध्येच असलं पाहिजे. तिथे मोठी गरज आहे आणि हा तातडीचा प्रश्न आहे. हे केंद्र वेस्ट बँकमध्ये अजिबात उभारलं जाऊ शकत नाही. जिथे सर्वाधिक गरज आहे, तिथेच त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. युद्ध संपल्यानंतर भारत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल, अशी मला आशा आहे. भारत गाझामध्येही आमच्यासोबत असेल, याची मला पूर्ण खात्री आहे," असं ते म्हणाले.

कृत्रिम अवयव केंद्राच्या जागेबाबत आपण भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या माध्यमातून भारत सरकारशी सविस्तर चर्चा केलीय, अशी माहिती राजदूत शावेश यांनी दिली. "लवकरच आपण काहीतरी महत्त्वपूर्ण करू शकू, अशी मला आशा वाटते," असं ते म्हणाले. दिल्लीकडून सध्या औषधांचा मोठा पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याच वेळी भारतीय खाजगी क्षेत्राले यापूर्वीच काही उत्तम मशिन्स, औषधं आणि वैद्यकीय साहित्य पाठवलंय, असं राजदूत शावेश यांनी सांगितलं. "यातल्या काही औषधांचा वापर करून काही दिवसांपूर्वीच वेस्ट बँकमधल्या आमच्या एका मुलाचे प्राण वाचले, ही गोष्ट मी खात्रीने सांगू शकतो," असं ते म्हणाले.

राजदूत पुढे म्हणाले, "मी सरकार आणि भारतातल्या लोकांपर्यंत संपर्क साधलाय. परराष्ट्रमंत्र्यांच्या माध्यमातून भारत सरकारने मदत करण्याचं आश्वासन दिलंय. माझ्याकडे सर्व सविस्तर माहिती नाही. औषधं आणि वैद्यकीय उपकरणं वाटेत असतील किंवा ती पॅलेस्टाईनच्या दिशेने लवकरच निघतील, याची मला पूर्ण खात्री आहे. हा केवळ वाहतुकीचा प्रश्न आहे, त्याहून अधिक काहीही नाही. या संदर्भात अधिक मदतीसाठी आम्ही सरकार आणि परराष्ट्रमंत्र्यांशी अजूनही चर्चा करतोय."

जुलै महिन्यात ब्रुसेल्स इथे पॅलेस्टाईन देणगीदार गटाची बैठक पार पडली. पॅलेस्टाईनमध्ये विशेष रुग्णालय, कृत्रिम अवयव केंद्र आणि व्यावसायिक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची योजना भारताने तिथे जाहीर केली. याशिवाय नवी दिल्लीने पॅलेस्टिनियन इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमसी बांधण्याचं आश्वासनही दिलं. सुमारे १७५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या विकास मदतीद्वारे पॅलेस्टिनी लोकांचं दैनंदिन जीवन सुधारायला भारत ठामपणे कटिबद्ध आहे. या मदतीमध्ये विकास प्रकल्प, मानवतावादी मदत आणि पॅलेस्टाईन निर्वासितांसाठी काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेला (यूएनआरडब्ल्यूए) दिलेल्या योगदानाचा समावेश आहे.

भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य व्हावा, यासाठी आपला देश ठामपणे भारताच्या पाठीशी उभा आहे, असंही पॅलेस्टाईनचे राजदूत म्हणाले. सुरक्षा परिषदेतल्या अस्थायी जागांसाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीत भारत नेता म्हणून समोर येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. "आमचा आणखी एक मित्र तिथे उपस्थित राहील. तिथून आम्हाला आणखी एक आवाज मिळेल," असं शावेश म्हणाले. सुरक्षा परिषदेत पॅलेस्टाईनला मतदानाचा अधिकार नाही, हे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

वरिष्ठ मुत्सद्दी श्रीप्रिया रंगनाथन सध्या पॅलेस्टाईन आणि शेजारील लेबनॉन व इजिप्तच्या महत्त्वाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर अब्दुल्ला एम. अबू शावेश यांनी प्रतिक्रिया दिली. "हा दौरा आमच्या दोघांसाठीही महत्त्वपूर्ण आहे. पॅलेस्टिनी लोक भयानक परिस्थितीचा सामना करत असताना त्या तिथे आल्या आहेत. इथलं आरोग्य क्षेत्र आणि शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोसळण्याच्या मार्गावर आहे. अशा कठीण परिस्थितीत आम्ही मदतीसाठी ज्या देशांशी संपर्क साधतो, त्यामध्ये भारताचं नाव सर्वात आघाडीवर आहे," असं ते म्हणाले.

"भारताने पॅलेस्टाईनमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचं आश्वासनही दिलंय. पॅलेस्टिनी लोकांकडे अनेक महत्त्वाचे फायदे आहेत. आम्ही सुशिक्षित लोक आहोत आणि आमचा साक्षरता दर ९७.३% आहे. कृषी क्षेत्रात आम्ही महत्त्वपूर्ण काम करू शकतो. आमच्याकडे जाफा ट्रेडमार्क आहे. खजुराची झाडं आणि ऑलिव्हची झाडं लावण्यात आम्ही निष्णात आहोत. आधुनिक शेतीत, म्हणजेच ग्रीनहाऊस शेतीत आम्ही पारंगत आहोत. आम्ही नक्कीच काहीतरी मोठं करू, अशी मला आशा आहे. आम्हाला योग्य संधी मिळाल्यास आम्ही हे आधुनिक तंत्रज्ञान भारताला देऊ शकतो," असा विचार त्यांनी मांडला.

हेही वाचा: युद्धग्रस्त गाझामध्ये उभारणार स्पेशालिटी हॉस्पिटल आणि 'कृत्रिम अवयव केंद्र'

पॅलेस्टाईनमधल्या निवडणुकांवर अब्दुल्ला एम. अबू शावेश यांनी भाष्य केलं. "निवडणुका पार पडतील, अशी आम्हाला आशा आहे. आमचे राष्ट्रपती महमूद अब्बास २०२१ पासून सत्तेवर आहेत. इस्रायलचा तीव्र विरोध समोर उभा आहे आणि ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे. व्याप्त वेस्ट बँकमध्ये आम्हाला या निवडणुका घ्यायला ते अजिबात परवानगी देत नाहीत. १९९४ आणि २००६ मध्ये आमच्याकडे निवडणुका पार पडल्या. व्याप्त वेस्ट बँक, गाझा आणि पूर्व जेरुसलेममध्येही त्या झाल्या होत्या. चार वर्षांपूर्वी इस्रायली लोकांनी खंबीरपणे उभं राहून आम्हाला यासाठी अजिबात परवानगी दिली नाही."

"आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे आम्हाला यावेळी या निवडणुका घेणं शक्य होईल, अशी आम्हाला खूप आशा आहे. गाझा, वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेममध्ये आम्ही आगामी निवडणुकीसाठी आमच्या लोकांची नोंदणी सुरू केलीय. अनेक पॅलेस्टिनी लोक आणि राजकीय नेते स्वतःची वेगळी आघाडी बनवून आगामी निवडणुकीत स्पर्धा करण्याबद्दल चर्चा करताहेत. या वर्षाच्या अखेरीस आम्ही पॅलेस्टिनी नागरिक म्हणून आमच्या निवडणुकीच्या अंमलबजावणीला सुरुवात करू शकू, अशी मला आशा वाटते," असं ते शेवटी म्हणाले.