नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नवी दिल्लीतील संविधान सदन येथे ब्रिक्स (BRICS) राष्ट्रांच्या संसदीय शिष्टमंडळांची भेट घेतली. यामध्ये रशिया, चीन, इराण आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील शिष्टमंडळांचा समावेश होता.
नवी दिल्लीतील संविधान सदन येथे १२ व्या ब्रिक्स संसदीय मंचाचे (BRICS Parliamentary Forum) आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमात ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांचे संसदीय नेते एकत्र आले असून, याद्वारे संसदीय सहकार्य बळकट करणे आणि लोकाभिमुख विकासाला गती देण्यावर चर्चा केली जात आहे. मंचाच्या उद्घाटन सत्रानंतर पंतप्रधान मोदींनी शिष्टमंडळांशी संवाद साधला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसचे खासदार शशी थरूर आणि इतर भारतीय खासदारांनीही सहभागी होत ब्रिक्स सदस्य व भागीदार देशांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या दोन दिवसीय परिषदेत ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, यूएई आणि इराण हे सदस्य देश सहभागी झाले आहेत. याशिवाय बेलारूस, क्युबा, थायलंड, युगांडा, व्हिएतनाम, उझबेकिस्तान आणि कझाकस्तान हे भागीदार देशही या बैठकीला उपस्थित आहेत.