नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते बनासकांठा येथे १४ हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि शिलान्यास करणार आहेत. याशिवाय, एकता नगर येथे ४०० कोटींहून अधिक रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी केली जाणार असून, पीएम-किसान योजनेचा २४ वा हप्ताही याद्वारे वितरीत केला जाईल.
पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आपल्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी सकाळी बनासकांठा येथील एम्ब्रियो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी-इन विट्रो फर्टिलायझेशन (ET-IVF) प्रयोगशाळा आणि भारत बोव्हाइन ब्रीडिंग अँड रिसर्च सेंटरला (BBBRC) भेट देतील. भिल्डी येथे १२७ एकरांवर पसरलेले हे अत्याधुनिक केंद्र कांक्रेज गोवंश संवर्धनासाठी देशातील पहिलेच केंद्र ठरणार आहे. याशिवाय बनास डेअरीचे दोन बायो-सीएनजी प्रकल्प, अहमदाबाद मेट्रो फेज-२ ची पायाभरणी आणि किसान सन्मान निधीचा १९ हजार कोटी रुपयांचा २४ वा हप्ता त्यांच्या हस्ते वितरित केला जाईल.
दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी (३१ ऑक्टोबर) पंतप्रधान मोदी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंती निमित्त 'राष्ट्रीय एकता दिवस' सोहळ्यात सहभागी होण्यापूर्वी स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पुष्पांजली अर्पण करतील. एकता नगर येथे 'भारत पर्व २०२६' चे उद्घाटन, एकता प्रकाश पर्व आणि नर्मदा आरतीमध्ये ते सहभागी होणार आहेत. तसेच सुरक्षा दलांच्या संचलनाचे अवलोकन करत डाव्या विचारसरणीच्या अतिरेकाविरुद्ध सुरक्षा दलांच्या यशाचा आढावा घेतला जाईल.