नवी दिल्ली
स्वातंत्र्यदिन अत्यंत सन्मान, अभिमान आणि गौरवशाली वातावरणात साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले आहे. तसेच देशवासीयांनी विकसित भारताचा संकल्प करावा, असे जोरदार आवाहन त्यांनी केले. संसदेच्या भवनात सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) साप्ताहिक 'मंगल मिलन' बैठकीत ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी बैठकीच्या ठिकाणी पोहोचताच केंद्रीय मंत्री आणि एनडीएच्या खासदारांनी राष्ट्रध्वज फडकवत आणि 'वंदे मातरम्', 'भारत माता की जय' अशा घोषणा देत त्यांचे स्वागत केले. उपस्थितांच्या या उत्साहाला प्रतिसाद देत पंतप्रधान मोदींनीही स्वतः हातात राष्ट्रीय ध्वज घेऊन सर्वांचे अभिवादन केले. या बैठकीत 'हर घर तिरंगा' मोहिमेवर भर देण्यात आला.
एनडीएच्या या संसदीय दल बैठकीत जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी जलशक्ती मंत्रालयाच्या विविध उपक्रमांवर आणि धोरणांवर एक विशेष प्रस्तुतीकरण (Presentation) सादर केले. या बैठकीला भाजप अध्यक्ष नितीन नवीन, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह एनडीए घटक पक्षांचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
दरम्यान, संसदेचे पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्ट रोजी संपत असून, यादरम्यान विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. बैठकीनंतर एनडीएच्या खासदारांनी मकर द्वारासमोर निदर्शने केली.