भारताच्या 'टेक' क्रांतीला गुगलचे बळ! विशाखापट्टणममध्ये देशातील पहिले AI हब

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'गुगल'ने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम (वायझॅग) येथे देशातील पहिले 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब' (AI Hub) स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या भव्य प्रकल्पासाठी गुगल पुढील पाच वर्षांत सुमारे १५ अब्ज डॉलर्सची (सुमारे १.२५ लाख कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाचे स्वागत करत, याला भारताच्या 'डिजिटल अर्थव्यवस्थे'साठी एक मोठे पाऊल म्हटले आहे.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. ते म्हणाले, "या हबच्या माध्यमातून आम्ही आमचे सर्वोत्तम तंत्रज्ञान भारतातील उद्योजक आणि युजर्सपर्यंत पोहोचवू, ज्यामुळे देशभरात AI इनोव्हेशनला गती मिळेल." हा अमेरिकेबाहेरील गुगलचा सर्वात मोठा AI हब असेल. या प्रकल्पात 'अदानीकनेक्स' आणि 'एअरटेल' या कंपन्याही भागीदार असतील.

पंतप्रधान मोदी यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वरून या घोषणेबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, "विशाखापट्टणमसारख्या उत्साही शहरात गुगल AI हब सुरू होत असल्याचा आनंद आहे. ही गुंतवणूक 'विकसित भारत' घडवण्याच्या आमच्या दूरदृष्टीशी जुळणारी आहे. यामुळे तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण होईल आणि 'सर्वांसाठी AI' (AI for All) हे ध्येय साध्य होण्यास मदत मिळेल."

या प्रकल्पांतर्गत एक भव्य डेटा सेंटर, आंतरराष्ट्रीय सबसी केबल (समुद्राखालून जाणारी केबल) आणि मोठ्या प्रमाणावर ऊर्जा पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. गुगलचे सर्च, यूट्यूब आणि जीमेल यांसारखे लोकप्रिय प्लॅटफॉर्म पहिल्यांदाच या भारतीय हबवरून चालवले जातील. या गुंतवणुकीमुळे आंध्र प्रदेशात ५,००० ते ६,००० थेट नोकऱ्या आणि एकूण ३०,००० पर्यंत रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.