Pune Police Withdraw Freedom of Religion Act: कायदा अजून लागूच नाही! पुणे पोलिसांनी दोन गुन्ह्यांमधील वादग्रस्त कलमे हटवली

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 5 h ago
पुणे पोलीस
पुणे पोलीस

 

पुणे 

पुण्यात नोंदवलेल्या दोन वेगवेगळ्या धर्मांतर प्रकरणांमध्ये 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्या'ची (Maharashtra Freedom of Religion Act) कलमे लावल्यानंतर, हा कायदा अद्याप अमलात आला नसल्याचे लक्षात आल्यावर पुणे पोलिसांनी तातडीने ती कलमे मागे घेतली आहेत. सरकारच्या अधिसूचनेनुसार हा कायदा आगामी २६ ऑगस्ट २०२६ पासून लागू होणार आहे.

फुरसुंगी पोलीस ठाण्यात ५ ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन पत्नीला बळजबरीने धर्म बदलण्यास भाग पाडल्याप्रकरणी आणि खडक पोलीस ठाण्यात युकेमधील एका ओसीआय (OCI) कार्डधारकाविरुद्ध ख्रिश्चन धर्माचा प्रचार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दोन्ही गुन्ह्यांत पोलिसांनी सुरुवातीला धर्मस्वातंत्र्य कायद्याची कलमे लावली होती. राष्ट्रपतींच्या मान्यतेची अधिसूचना आल्यानंतर हा कायदा कोणत्या तारखेपासून लागू होईल हे स्पष्ट न झाल्याने ही तांत्रिक चूक झाल्याचे पोलीस आयुक्त अमीतेश कुमार यांनी स्पष्ट केले.

इतर कलमांनुसार तपास सुरू राहणार

या प्रकरणी बोलताना पोलीस आयुक्त अमीतेश कुमार यांनी सांगितले की, आम्ही महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याची कलमे मागे घेतली आहेत, परंतु इतर कायद्यांतर्गत नोंदवलेले गुन्हे कायम राहतील आणि त्यानुसार तपास केला जाईल. गुन्हा नोंदवताना अधिकाऱ्यांना हा कायदा आधीच लागू झाल्याचा गैरसमज झाला होता, जो आता दुरुस्त करण्यात आला आहे.