नवी दिल्ली
कतारमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात १२ भारतीय नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेवर कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या कठीण प्रसंगी कतार सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
कतारमध्ये काम करणाऱ्या १२ भारतीयांचा एका अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समजताच दोन्ही देशांच्या सरकारी यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांच्या प्रति सहवेदना व्यक्त केल्या आहेत. कतारच्या अमीरने या घटनेबद्दल माहिती देताना मृतांच्या नातेवाईकांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या.
भारतीय दूतावासाच्या माध्यमातून मृतदेह मायदेशी आणण्यासाठी आणि आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कतार सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. पंतप्रधान मोदींनी या दु:खद प्रसंगी कतार सरकारकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल अमीर यांचे आभार मानले आहेत. या अपघाताचे नेमके कारण काय होते, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, मात्र संबंधित यंत्रणांकडून या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतला जात आहे.