पुढची युद्धे अल्गोरिदमने लढली जातील - संरक्षण मंत्री

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

 

"आज भारतात १०० पेक्षा जास्त 'युनिकॉर्न' (Unicorns) आहेत, पण संरक्षण क्षेत्रात एकही नाही. भारतातील पहिला 'डिफेन्स युनिकॉर्न' तुमच्यापैकीच कोणीतरी स्थापन करावा," असे भावनिक आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील तरुण उद्योजक आणि स्टार्टअप्सना केले आहे. नवी दिल्ली येथे संरक्षण उत्पादन संधींवरील एका राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.

'आत्मनिर्भर भारत' अभियानाच्या प्रगतीवर बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, "आत्मनिर्भरतेचा हा प्रवास आता केवळ धोरणांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो कृतीत उतरला आहे आणि त्याचा प्रभाव जागतिक स्तरावर दिसत आहे." त्यांनी सांगितले की, संरक्षण क्षेत्रात स्टार्टअप्स आणि एमएसएमई (MSME) उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या एकूण वार्षिक खरेदीपैकी किमान २५% खरेदी ही सूक्ष्म आणि लघु उद्योगांकडून केली जाईल, हे धोरण सुनिश्चित करण्यात आले आहे. तसेच, ३५० पेक्षा जास्त वस्तू केवळ याच उद्योगांकडून खरेदी करण्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राजनाथ सिंह यांनी भविष्यातील युद्धांचे स्वरूप बदलत असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, "पुढची युद्धे केवळ शस्त्रास्त्रांवर नव्हे, तर अल्गोरिदम, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ड्रोन, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि सायबर तंत्रज्ञानावर लढली जातील. त्यामुळे आपल्याला केवळ तंत्रज्ञान वापरणारे बनायचे नाही, तर तंत्रज्ञान निर्माण करणारे बनायचे आहे."

संरक्षण उत्पादनातील वाढीची आकडेवारी देताना ते म्हणाले की, २०१४ मध्ये देशातील संरक्षण उत्पादन ४६,००० कोटी रुपयांचे होते, जे आज १.५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. "ही केवळ आकडेवारीतील वाढ नाही, तर परावलंबनातून आत्मविश्वासाकडे झालेला हा बदल आहे," असे त्यांनी अभिमानाने सांगितले.