देशातील तरूणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे रोजगार मेळ्याअंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे ५१००० उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले.
नवीन नियुक्त्या मिळालेल्या उमेदवारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियुक्तीपत्रे मिळाल्या बद्दल सर्वांचं अभिनंदन केले.
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाने २०४७ पर्यंत विकसित भारत बनण्याचा संकल्प केला आहे. येत्या काही वर्षात आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत. या काळात प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याची खूप मोठी भूमिका असणार आहे.
नागरिक-प्रथम या भावनेने काम करणे गरजेचे आहे. तुम्ही तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाढलेल्या पिढीचा भाग आहात, तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, असेगी पीएम मोदी म्हणाले.
देशात ४६ ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. राष्ट्रीय रोजगार मेळाव्याअंतर्गत २०२३ अखेरच्या शेवटापर्यंत १० लाख तरुणांना सरकारी नौकरी देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.