एस. जयशंकर यांचा दहशतवाद्यांना खणखणीत इशारा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 d ago
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

 

दहशतवादाचा सामना करण्यासाठी आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी भारताकडे पूर्ण अधिकार आहे. भारत या अधिकाराचा नक्कीच वापर करेल, असे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले. पुण्यात त्यांच्या 'वाय भारत मॅटर्स' या पुस्तकावर आधारित एका कार्यक्रमात ते बोलत होते. दहशतवाद्यांनी कोणत्याही नियमांचे पालन केलेले नसते. त्यामुळे दहशतवाद्यांना उत्तर देताना नियमांच्या चौकटीत राहण्याची अपेक्षा कोणीही करू नये, असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना भारत त्याच भाषेत उत्तर देईल. उरी आणि बालाकोट येथील कारवाईमुळे भारताच्या परराष्ट्र धोरणातील बदल जगाने पाहिले आहेत. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांना आता भारताकडून सडेतोड उत्तर मिळते. भारत आता जुन्या विचारसरणीतून बाहेर आला असून दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेत आहे.

जगातील इतर कोणत्याही देशाला दहशतवादाचा सामना करावा लागला, तर ते शांत बसत नाहीत. भारतही आता गप्प बसणार नाही. दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देणे ही काळाची गरज बनली आहे. भारताने दहशतवादाविरूद्ध 'झिरो टॉलरन्स' धोरण स्वीकारले आहे. स्वतःच्या संरक्षणासाठी भारत आवश्यक ती सर्व पावले उचलेल, असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी भारताच्या बदलत्या जागतिक प्रतिमेवरही भाष्य केले. गेल्या १० वर्षांत भारताने जागतिक स्तरावर एक मजबूत स्थान निर्माण केले आहे. रशिया-युक्रेन संघर्षातही भारताने आपल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. परदेशात अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आणण्यासाठी सरकारने सातत्याने प्रयत्न केले आहेत. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.