पाकिस्तान सैन्य वारंवार भारतात घुसखोरी करण्यासाठी नवनवीन पद्धतींचा वापर करत असते. कधी तारा ओलांडून, तर कधी ड्रोनच्या सहाय्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत असतं. मात्र, आता असा एक प्रकार समोर आला आहे, ज्यामुळे पाकिस्तानचा काळा चेहरा आणखी स्पष्ट झाला आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील लोक सध्या त्यांच्याच देशातील सैनिकांविरोधात आंदोलन करत आहेत. 'हे सैनिक आहेत की दहशतवादी?' असा प्रश्न या नागरिकांनी उपस्थित केलाय. याला कारण म्हणजे, पाकिस्तानी सैन्य तिथल्या स्थानिकांचा वापर भारतात घुसखोरीसाठी करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैनिक पाकव्याप्त काश्मीरमधील गरीब नागरिकांचा वापर घुसखोरीसाठी करत आहेत. यासाठी ते या नागरिकांना पैशांचं आमिष देखील देत आहेत. मात्र, घुसखोरी करण्यात जे नागरिक अयशस्वी ठरतील; त्यांना पाकिस्तानी सैनिकच गोळ्या घालून ठार करत आहेत.
२३ आणि २४ जूनच्या रात्री पूंछमधील चक्का दा भाग गुलपुर या भागात चार संशयित दिसून आले होते. हे लोक भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय सैन्याने त्यांना हटकले होते. यावेळी ते लोक पाकिस्तानच्या दिशेने परत निघाले, तर पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना गोळ्या घालून ठार केले. यात दोघांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चार लोकांकडे नशेच्या गोळ्या आणि दारुगोळा देखील मिळाला. पूंछमधील गुलपूर सेक्टरजवळ ट्रेनोट आणि हजीरा भागात पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांचं लाँचिंग पॅड आणि एक कॅम्प सुरू केला आहे. याठिकाणी पाकव्याप्त काश्मीरमधील गरीब नागरिकांना घुसखोरीचं प्रशिक्षण दिलं जातं.