संघर्षाकडून संविधानाकडे! गडचिरोलीत ६० नक्षलवाद्यांचे ऐतिहासिक आत्मसमर्पण

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 3 h ago
शरणागती पत्करल्यानंतर मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संविधान स्वीकारताना मल्लोझुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती
शरणागती पत्करल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संविधान स्वीकारताना मल्लोझुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती

 

गडचिरोली

"एकतर माओवाद्यांनी शरण यावं, अन्यथा त्यांना कंठस्नान घालू," या सरकारच्या ठाम भूमिकेला आणि सुरक्षा दलांच्या सातत्यपूर्ण कारवायांना आज (बुधवार) ऐतिहासिक यश मिळाले आहे. नक्षलवादी चळवळीचा 'थिंक टँक' आणि तब्बल १० कोटी रुपयांपेक्षा जास्त बक्षीस असलेला, CPI (Maoist) चा पॉलिट ब्युरो सदस्य मल्लोझुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती उर्फ सोनू याने आपल्या ६० साथीदारांसह गडचिरोलीत आत्मसमर्पण केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या शरणागतीमुळे, अनेक दशकांपासून सुरू असलेल्या नक्षलवादी चळवळीला आतापर्यंतचा सर्वात मोठा हादरा बसला आहे.

हातात संविधान घेऊन शरणागती

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असतील, तरच शरणागती पत्करेन," अशी अट भूपतीने घातली होती. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी आपला नियोजित दौरा बदलून आज सकाळी गडचिरोली गाठले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, भूपती आणि त्याच्या साथीदारांनी हातात भारतीय संविधानाची प्रत घेऊन शरणागती पत्करली. मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांच्या हातात संविधानाची प्रत सोपवली आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भूपतीची पत्नी विमला सिडाम उर्फ तारक्का हिलाही मंचावर बोलावून तिचा सत्कार केला. तारक्का याच वर्षी १ जानेवारीला शरण आली होती आणि तिच्याच प्रयत्नांमुळे भूपती शरण आल्याचे म्हटले जात आहे.

नक्षलवादाचा अंत जवळ - मुख्यमंत्री

या ऐतिहासिक क्षणी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'ट्विन स्ट्रॅटेजी' (विकास आणि कारवाई) आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील रणनीतीमुळे देशातून माओवादाचे उच्चाटन होत आहे. भूपतीसारख्या म्होरक्याचे आत्मसमर्पण हे ऐतिहासिक आहे." ते पुढे म्हणाले, "एकीकडे विकास कामांमुळे नवीन भरती बंद झाली आणि दुसरीकडे आमच्या कारवायांमुळे माओवादाला ओहोटी लागली. आता माओवाद १००% संपण्याच्या मार्गावर आहे. जे संविधान स्वीकारतील, राज्य त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आणि त्यांचे उत्तम पुनर्वसन करेल. पण जे ऐकणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई सुरूच राहील. आता आमचे लक्ष शहरी माओवाद्यांवर आहे."

मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीच्या विकासाचा संकल्पही बोलून दाखवला. ते म्हणाले, "पुढील ५ ते ७ वर्षांत गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये १ लाख स्थानिक तरुणांना रोजगार देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. गडचिरोलीला देशाचा 'ग्रीन स्टील हब' बनवण्याचा आमचा मानस आहे."

कोण होता 'भूपती'?

६९ वर्षीय भूपती हा तेलंगणाचा रहिवासी असून, गेल्या ४० वर्षांपासून नक्षलवादी चळवळीत सक्रिय होता. त्याचा मोठा भाऊ आणि कुख्यात नक्षली नेता मल्लोझुला कोटेश्वर राव उर्फ किशनजी याच्यासोबत त्याने १९८० च्या दशकात गडचिरोलीत नक्षलवादाची पाळेमुळे रुजवली होती. तो चळवळीचा एक चतुर रणनीतीकार, केंद्रीय समिती सदस्य आणि प्रवक्ता (अभय या नावाने) म्हणून काम पाहत होता. एप्रिल २०१० मध्ये छत्तीसगडमध्ये केंद्रीय राखीव दलाच्या ७६ जवानांच्या हत्येचा तोच मास्टरमाइंड होता. त्याच्यावर गडचिरोलीसह छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांची जबाबदारी होती.

शरणागती का पत्करली?

गेल्या काही महिन्यांपासून भूपती आणि नक्षलवादी संघटनेच्या सर्वोच्च नेतृत्वामध्ये तीव्र मतभेद सुरू होते. "सशस्त्र संघर्षातून यश मिळत नाहीये, लोकांचा पाठिंबा कमी होत आहे आणि शेकडो सहकारी मारले जात आहेत," असे त्याचे म्हणणे होते. त्याने शांतता आणि चर्चेचा मार्ग स्वीकारण्याची विनंती केली होती, ज्याला संघटनेच्या इतर नेत्यांनी विरोध केला. याच वर्षी त्याची पत्नी तारक्का आणि सप्टेंबरमध्ये वहिनी सुजाता यांनीही आत्मसमर्पण केले होते. या सर्व पार्श्वभूमीवर, संघटनेच्या दबावामुळेच त्याने शस्त्र खाली ठेवण्याचा निर्णय घेतला.