यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदींची विशेष उपस्थिती!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 14 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान

 

संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे एका अत्यंत संक्षिप्त दौऱ्यासाठी भारतात आले होते. त्यांचा हा दौरा अवघ्या २ तासांचा होता. मात्र, या छोट्याशा भेटीसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीहून खास अहमदाबादला पोहोचले. पंतप्रधानांच्या या विशेष कृतीमुळे दोन्ही देशांमधील मैत्रीचे घट्ट बंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.

अहमदाबाद विमानतळावर पंतप्रधान मोदींनी शेख मोहम्मद बिन झायेद यांचे आलिंगन देऊन स्वागत केले. प्रोटोकॉलच्या पलीकडे जाऊन पंतप्रधानांनी दाखवलेला हा जिव्हाळा जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांवर सविस्तर चर्चा झाली. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि ऊर्जा या क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावर त्यांनी भर दिला.

गेल्या काही महिन्यांतील या दोन नेत्यांची ही चौथी भेट आहे. या सातत्यावरून भारत आणि यूएई यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचे महत्त्व स्पष्ट होते. याआधी जानेवारी २०२४ मध्ये 'व्हायब्रंट गुजरात' परिषदेसाठी यूएईचे अध्यक्ष गुजरातमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी रोड शोमध्येही सहभाग घेतला होता. रविवारच्या या भेटीतही दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारविनिमय केला. त्यानंतर यूएईचे अध्यक्ष त्यांच्या पुढील प्रवासासाठी रवाना झाले.