नवी दिल्लीत आजपासून सुरू होणाऱ्या 'एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कशाप्रकारे विकासाला गती देऊ शकते, नवीन रोजगार निर्माण करू शकते, सार्वजनिक सेवा सुधारू शकते आणि जगभरातील लोकांना फायदे मिळवून देऊ शकते, यावर ब्रिटनचा मुख्य भर असेल, असे ब्रिटीश सरकारने म्हटले आहे.
उपपंतप्रधान डेव्हिड लॅमी आणि एआय मंत्री कनिष्क नारायण यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटीश शिष्टमंडळ, एआय द्वारे जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातील दैनंदिन जीवन कसे सुधारू शकते, हे अधोरेखित करण्यास उत्सुक आहे. एआय हे नूतनीकरणाचे एक इंजिन आहे. हे तंत्रज्ञान डॉक्टरांना वेगाने निदान करण्यास, शिक्षकांना वैयक्तिक शिक्षण देण्यास, स्थानिक स्वराज्य संस्थांना काही मिनिटांत सेवा प्रदान करण्यास आणि व्यवसायांना नवीन पिढीतील उत्तम रोजगार निर्माण करण्यास मदत करू शकते, असा युक्तिवाद हे शिष्टमंडळ करणार आहे.
उपपंतप्रधान डेव्हिड लॅमी यांनी परिषदेपूर्वी दिलेल्या निवेदनात म्हटले की, "एआयचे पूर्ण फायदे आणि क्षमता मिळवण्यासाठी आपण आपल्या आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत कसे एकत्र काम करू शकतो, हे ठरवण्यासाठी ही परिषद एक महत्त्वाचा टण आहे. त्याच वेळी आपल्या सर्वांचे संरक्षण करणारी मजबूत आणि न्याय्य सुरक्षा मानके तयार करण्यावरही आमचा भर असेल." विज्ञान, नाविन्य आणि तंत्रज्ञान विभागाने (DSIT) म्हटले आहे की, भारत आणि ब्रिटन हे 'नैसर्गिक तंत्रज्ञान भागीदार' आहेत. इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि विप्रो यांसारख्या सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी संपूर्ण ब्रिटनमध्ये आपला व्यवसाय विस्तारला आहे.
एआय हे आपल्या पिढीचे निर्णायक तंत्रज्ञान : युकेचे एआय मंत्री
वेल्सचे पहिले भारतीय वंशाचे खासदार आणि युकेचे एआय मंत्री कनिष्क नारायण म्हणाले की, "एआय हे आपल्या पिढीचे निर्णायक तंत्रज्ञान आहे आणि ते सर्वांसाठी फायदेशीर ठरेल याची खात्री करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हे तंत्रज्ञान कामाचा खोळंबा कमी करू शकते, सार्वजनिक सेवा बदलू शकते, नवीन रोजगार निर्माण करू शकते आणि कष्टकरी समुदायांना एक नवी सुरुवात देऊ शकते – हाच संदेश आम्ही या परिषदेत घेऊन जात आहोत. आमच्या राष्ट्रीय नूतनीकरणाच्या योजनांमध्ये हे केंद्रस्थानी आहे, परंतु याचे फायदे केवळ काही लोकांसाठीच मर्यादित असू नयेत."
एआय मंत्री पुढे म्हणाले की, ब्रिटन यात आघाडीवर असून एआयच्या जागतिक दृष्टिकोनासाठी प्रयत्नशील आहे. यामुळे जगभरातील लोकांना अधिक शिकण्यास, अधिक कमावण्यास आणि त्यांच्या अटींवर भविष्य घडवण्यास मदत होईल. ब्रिटन आणि भारतातील लोक केवळ इतरांनी बनवलेले एआय पाहणार नाहीत, तर स्वतः एआय तयार करतील आणि त्याचा थेट लाभ घेतील, याची आम्ही खात्री करत आहोत.
दिल्लीव्यतिरिक्त, कनिष्क नारायण हे भारत आणि ब्रिटन प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी कसे एकत्र काम करत आहेत, हे पाहण्यासाठी बेंगळुरूचा दौरा देखील करणार आहेत. दोन्ही देश अत्याधुनिक संशोधनात कोट्यवधींची गुंतवणूक करत आहेत. यामध्ये ग्रामीण समुदायांसाठी उत्तम बॅटरी आणि पुढच्या पिढीतील दूरसंचार सुविधेपासून ते दुर्मिळ आजारांवर मात करू शकणाऱ्या जीनोमिक औषधांपर्यंतच्या संशोधनाचा समावेश असल्याचे 'DSIT' ने सांगितले आहे. साधारणपणे ब्रिटीश व्यवसायांसाठी भारत ही एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. ब्रिटीश कंपन्या भारतातील त्यांच्या व्यवसायातून ४७.५ अब्ज पाउंडपेक्षा जास्त महसूल मिळवत आहेत.
या आठवड्यात होणाऱ्या एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान, ब्रिटन एका 'आफ्रिकन लँग्वेज हब'साठी नवीन सहकार्य जाहीर करण्याची शक्यता आहे. यामुळे एआय ४० आफ्रिकन भाषांमध्ये काम करू शकेल. तंत्रज्ञान अधिक समावेशक आणि लाखो लोकांसाठी सुलभ बनवणे हा याचा उद्देश आहे. 'एआय फॉर डेव्हलपमेंट' (AI4D) कार्यक्रमांतर्गत जाहीर केल्या जाणाऱ्या तीन नवीन उपक्रमांपैकी हा एक असेल. विकसनशील देशांना एआय क्रांतीचा पूर्ण लाभ मिळावा यासाठी या कार्यक्रमासाठी १०० दशलक्ष पाउंडपेक्षा जास्त निधीची तरतूद केली आहे.
'एशियन AI4D ऑब्झर्व्हेटरी' दक्षिण आणि आग्नेय आशियातील जबाबदार एआय नाविन्य आणि प्रशासनास पाठिंबा देण्यावर भर देईल. तर केपटाऊन विद्यापीठातील 'AI4D कॉम्प्युट हब' आफ्रिकन संशोधकांना त्यांच्या कल्पनांचे प्रभावात रूपांतर करण्यासाठी आवश्यक असलेली संगणकीय शक्ती प्रदान करेल. नवी दिल्लीतील ही एआय इम्पॅक्ट समिट 'ग्लोबल साऊथ' मध्ये आयोजित केली जाणारी अशा प्रकारची पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आहे. लोकांचे कल्याण, पृथ्वीचे रक्षण आणि प्रगती या तीन सूत्रांवर आधारित सहकार्याचा भारताचा दृष्टीकोन यात केंद्रस्थानी आहे.