महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा आजपासून (मंगळवार, २ डिसेंबर २०२५) सुरू झाला आहे. राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत ६,०४२ नगरसेवक पदांसाठी आणि २६४ नगरपरिषदांच्या अध्यक्षपदांसाठी थेट मतदान होत आहे.
सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली असून, सायंकाळी ५.३० पर्यंत मतदारांना आपला हक्क बजावता येईल. या निवडणुकीचा निकाल उद्या, म्हणजेच ३ डिसेंबर रोजी जाहीर केला जाईल, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
१ कोटी मतदार बजावणार हक्क
ही निवडणूक म्हणजे राज्यातील मिनी विधानसभाच मानली जात आहे. या पहिल्या फेरीत सुमारे एक कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची ही प्रक्रिया ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करायची आहे.
राज्यात शांततापूर्ण मतदान व्हावे यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. एकूण १२,३१६ मतदान केंद्रे उभारण्यात आली असून, ६२,१०८ निवडणूक कर्मचारी राज्यभर कार्यरत आहेत. राज्य निवडणूक आयोगाने (SEC) १७,३६७ कंट्रोल युनिट्स आणि ३४,७३४ बॅलेट युनिट्सची व्यवस्था केली आहे.
राजकीय प्रतिष्ठा पणाला
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने २८८ पैकी २३५ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर वर्षभराने होत असलेल्या या स्थानिक निवडणुका महाराष्ट्रातील जनमताचा कौल दर्शवणाऱ्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
ही लढाई बहुआयामी झाली आहे. एकीकडे भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अशी 'महायुती' आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना (UBT), शरद पवारांची राष्ट्रवादी (SP) आणि काँग्रेस अशी 'महाविकास आघाडी' (MVA) उभी ठाकली आहे. युती आणि आघाडी असतानाही काही ठिकाणी 'मैत्रीपूर्ण लढती' आणि कुरघोडीचे राजकारण पाहायला मिळत आहे.
भाजपची बिनविरोध आघाडी
विरोधकांनी आपला प्रचार स्थानिक नेतृत्वावर केंद्रित केला असताना, भाजपने इतर पक्षांवर कुरघोडी करत सुरुवातीलाच आघाडी घेतली आहे. भाजपने १०० नगरसेवक पदे आणि तीन नगराध्यक्ष पदे बिनविरोध जिंकली आहेत.
काही ठिकाणी मतदान पुढे ढकलले
निवडणूक आयोगाने कायदेशीर अडचणी आणि न्यायालयीन प्रकरणांमुळे काही ठिकाणी मतदान पुढे ढकलले आहे. छाननी प्रक्रियेनंतर दाखल झालेल्या अपिलांमुळे २४ स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदान आता २० डिसेंबरला होणार आहे. तसेच, १५४ जागांसाठीचे मतदानही २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.
मुंबईसह २९ महानगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -