कर्नाटकातील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या कमी तीव्रतेच्या स्फॉटात १० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. बेंगळुरुच्या ब्रुकीफिल्ड परिसरात असलेले रामेश्वरम कॅफे प्रसिद्ध आहे. कॅफेचे सहसंस्थापक दिव्या राघवेंद्रा राव यांनी सांगितलं की, संबंधित अधिकाऱ्यांशी सहकार्य केले जात आहे. तसेच जखमींना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.
बेंगळुरु पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. स्फोटाप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. शुक्रवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला. कॅफेमध्ये बॅग ठेवणाऱ्या आरोपीला सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून ओळखण्यात आलं आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार, आयईडी डिव्हाईस टायमरसह स्फोट घडवण्यासाठी वापरण्यात आलंय.
कंपनीचे मालक राघवेंद्र राव आणि दिव्या राघवेंद्र राव कोण आहेत?
राघवेंद्र राव हे मेकॅनिकल इंजिनियर आहेत. त्यांना फूड इंडस्ट्रीमधील २० वर्षांचा अनुभव आहे. आयडीसी किचनचे ते संस्थापक आणि प्रवर्तक आहेत. रामेश्वरम कॅफे चेनचे ते ऑपरेशन हेड आहेत. दिव्या राघवेंद्र राव या सीए आहेत. रामेश्वरम कॅफेमधील आर्थिक विभाग आणि व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. कंपनीच्या वेबसाईटनुसार त्यांना १२ वर्षांचा अनुभव आहे.
स्फोट कसा घडवून आणण्यात आला?
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी स्फोटाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. स्फोटासाठी small improvised explosive device (IED) चा वापर करण्यात आला आहे. हा कमी तीव्रतेचा स्फोट होता. एक तरुण बारा वाजताच्या सुमारास कॅफेमध्ये आला. त्याने एक छोटी बॅग कॅफेमध्ये ठेवली. एक तासानंतर या बॅगेत स्फोट झाला.
२८ ते ३० वर्षांच्या तरुणाने रवा इडली खाण्यासाठी काऊंटरवरुन टोकन घेतले. पण, त्याने इडली खाल्ली नाही. त्याने छोटी बॅग तिथेच बाजूला ठेवून दिली आणि तो तेथून निघून गेला. त्यानंतर एका तासाने स्फोट झाला. तपास यंत्रणा आरोपीचा शोध घेत असून सर्व बाजूंनी तपास करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, बाँबस्फोटाचे कारण आणि स्वरूप शोधण्यासाठी तपास सुरू आहे. आयटीडीचा वापर करुन अत्याधुनिक यंत्र वापरले असल्याची शक्यता आहे. त्यात सहभागी असलेल्यांची ओळख पटवून कठोर कारवाई केली जाईल. दुपारी १२ वाजल्यानंतर कोणीतरी बॅग सोडून गेल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची सर्व बाजूंनी चौकशी सुरू असून सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.