सारा अझीझ : आंतरराष्ट्रीय बहुमान मिळवणारी भारताची शोधपत्रकार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
सारा अझीझ
सारा अझीझ

 

शम्पी चक्रवर्ती पुरकायस्थ

हेडलाईन्सच्या जगतात नाव कमावण्यासाठी नेहमी प्रकाशझोतात राहण्याची गरज नसते. पत्रकारितेची खरी सुरुवात अनेकदा अंधाऱ्या कोपऱ्यात दडलेले सत्य शोधताना होते. कागदपत्रे चाळत, विस्मृतीत गेलेल्या माणसांची कहाणी समोर आणत सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करणारे प्रश्न विचारणे, हाच तर पत्रकारितेचा खरा धर्म. कोलकात्याच्या सारा अझीझ या अवघ्या २५ वर्षांच्या तरुणीने हाच खडतर रस्ता निवडला.

२०२५ मध्ये ब्रिटनच्या प्रतिष्ठित 'प्रेस अवॉर्ड्स'मध्ये 'यंग जर्नालिस्ट ऑफ द इयर' श्रेणीत सारा यांना 'हायली कमेंडेड' हा बहुमान मिळाला. २२ मे रोजी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात अवघ्या २३ वर्षांच्या असताना त्यांचा सन्मान झाला. कोलकात्याच्या गल्ल्यांमधून सुरू झालेला हा प्रवास आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे.
 

शिक्षणासोबत पत्रकारितेचा श्रीगणेशा
सारा यांनी २०२३ मध्ये पदवीचे शिक्षण घेत असतानाच फ्रीलान्स पत्रकार म्हणून काम करायला सुरुवात केली होती. कोलकात्याच्या लोरिटो कॉलेजमध्ये इंग्रजी साहित्याचा अभ्यास करताना त्यांना शोधपत्रकारितेची (Investigative Journalism) आवड निर्माण झाली. पुढे त्यांनी अमेरिकेतील नामांकित कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ जर्नालिझममधून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी घेतली.

त्यांच्या कामाचा विस्तार द गार्डियन, टेलिग्राफ, साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट, द ख्रिश्चन सायन्स मॉनिटर, व्हॉईस ऑफ अमेरिका आणि द टाईम्स यांसारख्या जगातील आघाडीच्या वृत्तसंस्थांपर्यंत पसरलेला आहे.

दुर्लक्षित अन् संवेदनशील विषयांवर भाष्य
मुख्य प्रवाहातील बातम्यांच्या गर्दीत जे विषय मागे पडतात, त्यांना प्रकाशझोतात आणणे हेच सारा यांच्या पत्रकारितेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य. रोहिंग्या निर्वासितांचे आयुष्य, तुरुंगातील महिलांचे लैंगिक शोषण, मानवाधिकार उल्लंघन, महिलांचे आरोग्य अन् वंचित घटकांचा संघर्ष या विषयांवर त्यांनी थेट भाष्य केले.

फेब्रुवारी २०२४ मध्ये 'द गार्डियन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या शोधनिबंधाने खळबळ उडवून दिली. पश्चिम बंगालच्या तुरुंगात महिला कैद्यांचे होणारे लैंगिक शोषण त्यांनी समोर आणले. पुरुष आणि महिला कैद्यांना वेगळे ठेवण्याचे नियम असतानाही महिलांच्या सुरक्षेवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. यासाठी त्यांनी स्वतः ग्राउंड रिपोर्टिंग केले अन् छायाचित्रेही टिपली.
 

रोहिंग्या संकटाचे थेट वार्तांकन
रोहिंग्या निर्वासितांच्या प्रश्नावर त्यांनी केलेल्या वार्तांकनाने त्यांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली. 'व्हॉईस ऑफ अमेरिका'साठी काम करताना त्यांनी बांगलादेशातील रोहिंग्या छावण्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष स्थळावरून रिपोर्टिंग केले.

जानेवारी २०२५ मध्ये 'द गार्डियन'मधील एका रिपोर्टमध्ये त्यांनी बांगलादेश-म्यानमार सीमेवर अडकलेल्या रोहिंग्यांची दुर्दशा मांडली. 'द टेलिग्राफ'मधील त्यांच्या एका शोधनिबंधाने तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे वादळ उठवले. दिल्लीत प्रशासनाच्या ताब्यात असताना एका रोहिंग्या बालकाचा झालेला मृत्यू आणि त्यामागचे भयानक सत्य त्यांनी जगासमोर आणले. याच कामाच्या जोरावर त्यांना ब्रिटनच्या प्रेस अवॉर्ड्समध्ये विशेष बहुमान मिळाला.

जिद्द अन् अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
हा सन्मान मिळाल्यावर लिंक्डइनवरील पोस्टमध्ये त्यांनी 'द टेलिग्राफ' आणि 'द गार्डियन'मधील कामाचे श्रेय दिले. त्यांनी आई, बहीण, आजी, शिक्षक अन् कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांचे आभार मानले. सोबतच, विश्वासाने स्वतःच्या कहाण्या सांगणाऱ्या रोहिंग्या बांधवांचे ऋणात राहत असल्याचे सांगितले.

पुरस्कार घेण्यासाठी त्या ब्रिटनला जाणार होत्या, पण अमेरिकेच्या व्हिसाच्या तांत्रिक अडचणीमुळे त्यांना ऐनवेळी प्रवास रद्द करावा लागला. कठीण प्रसंगात पत्रकाराने अधिक संयम दाखवला पाहिजे, असा विचार त्यांनी मांडला. सारा फक्त पत्रकार नाहीत, तर एक कवयित्री अन् चित्रकार सुद्धा आहेत. 'द पोएट्री फाउंडेशन'ने त्यांच्या कवितेचा उल्लेख केला आहे.

कोलकात्यात कॉलेजमध्ये शिकताना सुरू झालेला हा प्रवास आज जागतिक व्यासपीठावर पोहोचला आहे. डिजिटल माध्यमांचा वापर करत ग्राउंडवर जाऊन लोकांना भेटणे, पुरावे तपासणे अन् कठीण प्रश्न विचारणे, या मूळ पत्रकारितेला त्यांनी जपले आहे. या तरुण पत्रकार तरुणीचा बहुतांश प्रवास अजून बाकी आहे, आणि भविष्यात त्या नवी क्षितिजे पादाक्रांत करतील यात शंका नाही.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter