अब्दुल हमीद : युजीसी-नेटमध्ये मैदान गाजवणारा तरुण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
अब्दुल हमीद
अब्दुल हमीद

 

तरुण नंदी

उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न उराशी बाळगून एक तरुण दररोज सकाळी आपल्या वडिलांसोबत शेतात राबायला जायचा. कधी जनावरांना चरवायची वेळ आली तर कधी गवत कापायची, हा सगळा नित्यक्रम तो हसतहसत पार पाडायचा. पण जसाच वेळ मिळेत, तसा तो आपली पुस्तके उघडून अभ्यासाला बसत असे.

आज हाच तरुण पश्चिम बंगालमधील वीरभूम जिल्ह्यातील नलहाटी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कुखुरा गावाचे नाव संपूर्ण देशात उंचावून सगळ्यांच्या कौतुकाचा विषय बनला आहे.

जून २०२६ च्या युजीसी-नेट परीक्षेचे निकाल जाहीर झाले आणि या तरुणानें इतिहास रचला. अरबी विषयात ३०० पैकी तब्बल २६६ गुण मिळवत त्याने १०० पर्सेंटाईल पटकावले. या विषयात परीक्षा दिलेल्या १,६४९ उमेदवारांमध्ये त्याने थेट पहिला नंबर पटकावला आहे. तसेच ज्युनियर रिसर्च फेेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठीही तो पात्र ठरला आहे.
 

संकटांनी भरलेले बालपण
अब्दुल हमीदच्या आयुष्यात आर्थिक संघर्ष नेहमीच सावलीसारखा सोबत होता. त्याचे वडील अब्दुल तवाब एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. पगाराचे गणित तसे बेताचेच, त्यामुळे संसाराचा गाडा हाकण्यासाठी ते शेतीही करत असत. घरची परिस्थिती हलाखीची असली, तरी मुलांच्या शिक्षणात कधीच खंड पडू नये, अशी वडिलांची इच्छा होती. लहानपणापासूनच हमीदने शेतात वडिलांना मदत करत करत आपल्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित केले.

त्याचा हा शैक्षणिक प्रवास एका मदरसापासून सुरू झाला, तिथेच त्याने कुराणही पाठ केले. त्यानंतर अलिया विद्यापीठातून अरबी विषयात पदवी पूर्ण केली आणि पुढे दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामियामधून ८.७५ सीजीपीए (CGPA) गुण मिळवून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

त्याचा हा संपूर्ण प्रवास खडतर संघर्षाने भरलेला होता. उच्च शिक्षणासाठी दिल्लीत गेल्यावर राहण्याची आणि खाण्यापिण्याच्या खर्चासाठी पैसे जुळवणे मोठे आव्हानात्मक होते. अनेकदा त्याला इतर तीन जणांसोबत एकाच खोलीत राहावे लागे. कधी कधी खर्च कमी करण्यासाठी तो आणि त्याचे मित्र स्वतःच जेवण बनवत, जेणेकरून शिक्षणात कोणताही खंड पडू नये.

कोणतीही महागडी क्लास कोचिंग नाही
युजीसी-नेट परीक्षा पास करणे हे हमीदचे सुरुवातीचे मूळ ध्येय नव्हते. त्याने फेब्रुवारी २०२६ मध्ये या परीक्षेची विशेष तयारी सुरू केली. त्यावेळी तो एका मदरशात शिकवण्यासोबतच एका मशिदीत इमाम म्हणूनही सेवा देत होता. पण अभ्यासाला पूर्ण वेळ देता यावा म्हणून त्याने नंतर शिक्षकाची नोकरी सोडली.

या परीक्षेसाठी त्याने कोणतीही महागडी कोचिंग क्लासेस लावलेली नाहीत. काही पुस्तके, यूट्यूबवरील व्हिडिओ, स्वतः काढलेल्या नोट्स आणि मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, या एवढ्याच जोरावर त्याने युजीसी-नेटचा अभ्यास केला. २९ जून रोजी सूरी येथील केंद्रावर त्याने परीक्षा दिली. त्यानंतर निकालाची लांब प्रतीक्षा संपली आणि २८ ऑगस्ट रोजी जेव्हा निकाल समोर आला, तेव्हा आपलाच निकाल पाहून हमीदला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
 

अरबी विषयात १०० पर्सेंटाईल! १,६४९ विद्यार्थ्यांमध्ये थेट पहिला क्रमांक!
ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी त्याच्या घरी एकच गर्दी केली. जो तरुण कधीकाळी वडिलांसोबत शेतात राबायला जायचा, त्याने आज आपल्या संपूर्ण गावाचा मान जगात उंचावला आहे. मातीशी नाळ जोडलेल्या या सुपुत्राच्या यशाने आज संपूर्ण गावाला अभिमान वाटत आहे.
 
अब्दुल हमीदचे ध्येय इथेच थांबलेले नाही. त्याचे पुढचे स्वप्न खूप मोठे आहे. त्याला अरबी विषयात संशोधन करायचे असून दिल्ली विद्यापीठ (DU) किंवा जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) पीएचडी करायची आहे. त्याचे असे मानणे आहे की, आयुष्यात संधी मोजक्याच असू शकतात, पण त्यामुळे तुमच्या स्वप्नांना आणि कठोर परिश्रम करण्याच्या जिद्दीला कधीच मर्यादा पडू नयेत.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter