अमीर खुसरो : हिंदू-मुस्लिम सलोख्याच्या परंपरेचा भोई!

Story by  आवाज़ मराठी | Published by  sameer shaikh • 8 Months ago
अमीर खुसरो आणि सरफराज अहमद यांचे नवे पुस्तक - 'अमीर खुसरो आणि दारा शुकोह : प्रवास एका इतिहासाचा'
अमीर खुसरो आणि सरफराज अहमद यांचे नवे पुस्तक - 'अमीर खुसरो आणि दारा शुकोह : प्रवास एका इतिहासाचा'

 

मराठीतील अभ्यासू विचारवंत आणि दखनी इतिहासकार म्हणून नावारूपाला आलेल्या सरफराज अहमद यांचे 'अमीर खुसरो आणि दारा शुकोह : प्रवास एका इतिहासाचा' हे नवे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले. त्यातील एक दीर्घ लेख आहे तुती-ए-हिंद (भारताचा पोपट) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरहुन्नरी अमीर खुसरोवर. मराठीतील प्रसिद्ध कवी आणि विचारवंत इंद्रजीत भालेराव यांनी अमीर खुसरोवरील लेख वाचताना केलेले हे मुक्तचिंतन खास आवाज मराठीच्या वाचकांसाठी...
 
- संपादक
 
शाही मुकुटातला प्रत्येक मोती 
गरीब शेतकऱ्याच्या साश्रुनयनातून 
टपकणारा रक्ताचा थेंब आहे 

ही शेतकरी आंदोलनासाठी लिहिलेली कुणा मार्क्सवादी कवीची कविता नाही. आठशे वर्षांपूर्वी भारतात होऊन गेलेल्या अमीर खुसरो या कवीची ती कविता आहे. अमीर खुसरो हा कवी होता, संगीतकार होता, तत्वज्ञ होता आणि सुफी संत होता. त्यानं अनेक रागांची निर्मिती केली. अनेक वाद्यांची निर्मिती केली. भक्ती आंदोलनाची पार्श्वभूमीही हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देऊन त्यानं तयार केली. त्याची वरील कविता वाचली आणि मला वेगळाच आनंद झाला, की अमीर खुसरो हा केवळ संत, कवी, कलावंत नव्हता तर तो एक सामाजिक जाणीव असलेला माणूस होता, हे वरील शब्दातून जाणवतं. राजदरबारात राहूनही वरील ओळी त्यानं आपल्या एका कवितेत लिहिल्या हे आणखी महत्त्वाचं. 

परवा लातूरला गेलो तेव्हा हरिती प्रकाशनाच्या दुकानात जाऊन आलो. हरिती प्रकाशनानेच प्रकाशित केलेली फ. म. शहाजींदे, सरफराज अहमद आणि सूर्यनारायण रणसुभे यांनी मुस्लिम समाजजीवनावर लिहिलेल्या पुस्तकाचा संच मुद्दाम घेतला. सरफराज अहमद यांनी आसफजाहिच्या इतिहासावर वेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलेली पुस्तकं माझ्याकडे आधीच होती. वेगळा दृष्टिकोन असलेला हा लेखक मी आवर्जून वाचत असतो. जाणकारांच्या मते तो इरफान हबीब आणि रोमिला थापर यांच्या परंपरेतील इतिहासकार आहे. 

'अमीर खुसरो आणि दारा शुकोह : प्रवास एका इतिहासाचा' हे त्यांचं आलेलं नवं पुस्तक. त्यातल्या पहिल्या लेखाचा अर्धाच भाग माझा वाचून झाला आहे. त्यावर ही नोंद लिहीत आहे. अमीर खुसरोच्या कवितांचे काही तुकडे या लेखात पहायला मिळाले आणि मला तो त्या काळातला ग्रामीण कवी देखील वाटला. वरील कवितेत शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोलणारा अमीर खुसरो एका कवितेत चिमणीच्या खोप्याविषयी लिहितो. मला असं वाटलं होतं की चिमणीच्या खोप्याविषयी जगातल्या इतर कुठल्या भाषेत कविता असेल का ? कारण मराठीत बहिणाबाई चौधरी यांनी एक आजरामर कविता लिहून ठेवलेली आहे. तितकी सुंदर कविता इतर भाषांमध्ये नसणारच हे मी नेहमी ठासून सांगायचो. पण अमीर खुसरोच्या कवितांच्या ओळी वाचताना 'बया का घोसला' नावाच्या दोन ओळी वाचायला मिळाल्या आणि मी हरकून गेलो. त्या ओळी अशा आहेत, 

एक अनोखा गिरह बनाया 
उपर नीव नीचे घर छाया 
बास न बल्ली बंधन घने 
कहो खुसरो घर कैसे बने 

जणू काही कोडं घातलेलं असावं तशा स्वरूपात अमीर खुसरोनं लिहिलेली ही कविता. एक असं अनोखं घर बनवलेलं आहे, ज्याचा पाया वर आणि सगळं घर खाली आहे. त्याला ना वेळू ना दोऱ्यांनी बांधलेला आहे, तरी ते इतकं पक्क आहे कि ते तुटू शकणारच नाही. सांगा हे घर कसं बनलं आणि कोणी बनवलं ? असा प्रश्न खुसरो विचारतो. ह्या दोन ओळी वाचल्या आणि आठशे वर्षांपूर्वी का होईना, फारशी भाषेत का होईना, बहिणाबाईंचा सहोदर कवी होता. चिमणीच्या खोप्याचं निरीक्षण करून त्यानं कविता लिहिलेली होती. हे वाचून मला अत्यानंद झाला. 

असंच एक आणखी कोडं खुसरोनं घातलेलं आहे. 

वाला था जब सबको भाया 
बडा हुआ कुछ काम न आया 
खुसरो कह दिया उसका नाम 
बुझे नही तो छोडो गाव 

या कोड्यात खुसरो विचारतो की, छोटा होता तेव्हा सगळ्यांना आवडायचा, पण मोठा झाल्यावर कुणाच्याच कामाला आला नाही, खुसरो म्हणतो सांगा याचं नाव, नाही सांगता आलं तर सोडून जा गाव. मला माझं लहानपण आठवलं. तेव्हा आम्ही एकमेकांना कोडी घालायचो. त्या कोड्याच्या शेवटच्या ओळीत असाच कोडं न ओळखणाराला काहीतरी टोमणा मारलेला असायचा. इथं खुसरो त्याला गाव सोडून जायला सांगतोय. 

खुसरोच्या ह्या कविता खडीबोलीमध्ये आहेत. म्हणजे लोकभाषेत आहेत. खुसरो हा उर्दू , फारशीचा पंडित कवी होता. पण त्याने लोकभाषेत रचना करायलाही अनमान केला नाही. विद्वत्ता आणि लोकभावना दोनही सोबत घेऊन चालणारा हा कवी मला फार महत्त्वाचा वाटतो. आपल्या मराठीत एकतर विद्वान कवी असतात किंवा लोककवी असतात. दोन्हींचा मेळ कुठे पाहायला मिळत नाही. पण अमीर खुसरोमध्ये तो मेळ आपणाला पाहायला मिळतो. 

अमीर खुसरोची प्रेमासंदर्भात एक रचना आहे. त्यातली प्रतिमा आज आपणाला आवडणार नाही. पण कदाचित त्याकाळी त्याला ती कल्पना आदर्श वाटली असावी. त्या कवितेत तो म्हणतो, 

खुसरो ऐसी प्रीत कर जैसे हिंदू जोय 
पुत पराये कराने जल जल कोयल होय 

दुसऱ्याच्या मुलासाठी, म्हणजे पतीसाठी सरणावर चढणाऱ्या हिंदू सती सारखं प्रेम करावं, असं खुसरोला वाटतं. त्याला कदाचित सतीच्या पाठीमागचा जुलूम तेव्हा लक्षात आला नसावा. किंबहुना आपल्या पतीसाठी कुणी सरणावर जातं ही गोष्टच त्याला रोमांचित करणारी वाटली असावी. म्हणून त्यानं ही कल्पना आपल्या कवितेत सर्वोच्च प्रेमाचं प्रतीक म्हणून वापरलेली आहे. खुसरोचा जन्म भारतातच झालेला होता. त्याची आई भारतीय आणि वडील इराणी होते. त्यामुळे त्यानं जन्मल्यापासून ही भूमी पाहिलेली होती. या भूमीविषयी त्याला अत्यंत प्रेम आणि आदर होता. 'हिंद माझी जन्मभूमी आणि माझा देश आहे, भारत हा पृथ्वीवरला स्वर्ग आहे, कारण प्रेषितांनी असं म्हटलय की देशावर प्रेम करणं हा ईमानाचाच भाग आहे, देश प्रेम करणे माझ्या धर्मनिष्ठेचा भाग आहे.' असं तो म्हणायचा. 

एच. एन. सोल्कनोज या भारताच्या मध्ययुगीन इतिहासाच्या सामाजिक पैलूंचा अभ्यास करणाऱ्या इतिहासकाराने खुसरोविषयी लिहिताना असं म्हटलय की, 'मध्ययुगीन काळात भारतीय संस्कृतीची पालखी खुसरोंनी आपल्या खांद्यावर घेतली. हिंदू-मुस्लिम सलोख्याच्या परंपरेचे ते भोई बनले. त्यांनी मानवी जाणिवा आणि समतेचे तत्व भारतीय समाजात रुजविण्यासाठी शब्दांचे माध्यम वापरले. स्वतःचा धर्म जपत त्याचे काटेकोर आचरण करीत वेगवेगळ्या धर्मानुयायांचे त्यांनी प्रबोधन केले. त्यामुळेच शतकानुशतके त्यांच्या कविता लोकमनावर अधिराज्य गाजवीत आलेल्या आहेत. इस्लामच्या उदारमतवादी परंपरेचे प्रतिनिधित्व करणारा खुसरो हा अद्वितीय कवी आहे.' 

- इंद्रजित भालेराव
(लेखक मराठीतील प्रसिद्ध कवी आहेत.)