नौदलातील प्रशिक्षणामुळेच कतारच्या तुरुंगात तग धरू शकलो - नौदल अधिकारी

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 2 Months ago
नौदल अधिकारी
नौदल अधिकारी

 

कतारमध्ये गेल्या वर्षी हेरगिरीच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या नौदलाच्या आठ अधिकाऱ्यांची नुकतीच मुक्तता करण्यात आली. यापैकी कतारहून केरळमध्ये आलेले रागेश गोपाकुमार या अधिकाऱ्याने स्वगृही व कुटुंबात परतल्याचा आनंद व समाधान व्यक्त केले. 'आम्ही जिवंत असल्यामुळेच आनंदी आहोत. स्वतःच्या घरी सुखरूप परतत्याचाही खूप आनंद आहे, अशा शब्दांत गोपाकुमार यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. संरक्षण दलांनी दिलेल्या
प्रशिक्षणामुळेच आम्ही कतारमध्ये कित्येक महिने तुरुंगात काढू शकलो, असेही त्यांनी सांगितले.

कतार सरकारने दोन दिवसांपूर्वीच त्यांच्यासह नौदलाच्या एकूण आठ अधिकाऱ्यांची सुटका केली होती. भारताच्या हस्तक्षेपामुळे त्यांच्या फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर करण्यात आले होते. भारतात आल्यानंतर केरळची राजधानी तिरुअनंतपूरपासून १६ कि.मी.वर असलेल्या बलरामपूरम या आपल्या गावी गोपाकुमार यांचे आगमन झाले. त्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी कुटुंबातील सदस्यांना मिठी मारली. 'पीटीआय' शी बोलताना कतारमधील तुरुंग व बंदिवासाचा अनुभव थरारक होता, असे त्यांनी सांगितले. तुरुंगात असताना तुमच्या कुटुंबाची काय अवस्था झाली होती, असे कोणी विचारल्यावर ते दिवसातून किमान पाच वेळा पत्नीला फोन करणाऱ्या पतीवर अचानक फोन
करणे बंद करण्याची वेळ आली तर त्याची काय अवस्था होईल, याची कल्पना करायला लावत. आपल्या सुटकेचे श्रेय त्यांनी कुटुंबीयांची प्रार्थना आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नांना दिले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक्त कंठाने प्रशंसा करताना ते म्हणाले, की केवळ पंतप्रधान मोदी यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपामुळेच कतारमधील तुरुंगातून आम्हा सर्वांची सुटका होऊ शकली. मोदी यांनी हस्तक्षेप केला तर आपली सुटका होईल, अशी आम्हा सर्वाची आशा होती, मात्र, त्यासाठी किती वेळ लागेल, याची काहीच कल्पना नव्हती.

कतारमधील तुरुंगातील खडतर दिवसांबद्दल ते म्हणाले, की संरक्षण दलांतील प्रशिक्षणामुळे आमचा निभाव लागला. भारतीय नौदलातून २०१७ मध्ये निवृत्त झात्यानंतर त्यांनी संवाद प्रशिक्षक म्हणून ओमान संरक्षण प्रशिक्षण कंपनीत नोकरीला सुरुवात केली. त्यांच्यासह नौदलाच्या आठ अधिकाऱ्यांवर हेरगिरीचा आरोप होता.