युद्धाच्या उंबरठ्यावर पश्चिम आशिया

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 30 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

निखिल श्रावगे,
पश्चिम आशियातील परिस्थिती हाताबाहेर जात त्याची निर्नायकीकडे वाटचाल सुरू आहे. इस्राईलचे पंतप्रधान नेतान्याहू आपल्याविरोधातील नाराजी निष्प्रभ करण्यासाठी आक्रमक राष्ट्रवादाचे यज्ञकुंड पेटते कसे राहील, या प्रयत्नात आहेत, तर अमेरिकी राज्यकर्ते निवडणुकीवर डोळा ठेवून अगदी संकुचित दृष्टिकोनातून इस्राईल-हमास-इराण संघर्षाकडे पाहात आहेत.

सात ऑक्टोबर २०२३ रोजी 'हमास' या पॅलेस्टाईनस्थित दहशतवादी गटाने तेथील इतर दहशतवादी गटांसोबत समन्वय साधत गाझा पट्टीतून इस्राईलमध्ये घुसून हल्ला चढवला. प्रत्यक्षपणे आणि रॉकेटच्या माध्यमातून केलेल्या या हल्ल्यात सुमारे १२०० मृत्युमुखी पडले. गाझा पट्टीत परत जाताना ''हमास''ने सुमारे २५० इस्राईलच्या नागरिकांचे अपहरण करीत त्यांना ओलीस ठेवले. चवताळलेल्या इस्राईलने त्या दिवसानंतर आजतागायत पॅलेस्टाईन, गाझावर जवळपास रोज हल्ला करत युद्धमान परिस्थिती कायम ठेवली आहे. या संघर्षाची व्याप्ती वाढत असून त्याचे लोण आता लेबेनॉनपासून ते थेट इराणपर्यंत पोहोचले आहे. संघर्षातील कोणताही एक घटक नमते घ्यायला तयार नसताना हा पेच नजीकच्या काळात सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे, तुम्हाला-आम्हाला ''आता पुढे काय?'' हा विचार करणे क्रमप्राप्त आहे.

इस्राईलच्या शासकीय सुट्टीचा दिवस निवडून हमासने केलेला हल्ला इस्राईलचा '९/११' समजला जातो. अपयशी ठरलेली गुप्तचर यंत्रणा, लष्करी हेर आणि सरतेशेवटी प्रशासनाचे प्रमुख म्हणून याची नैतिक जबाबदारी पंतप्रधान नेतान्याहू यांच्यावर ओघाने आली. युद्धखोर म्हणून ओळखले जाणारे आणि पूर्ण बहुमत नसताना युती केलेल्या पक्षांच्या कुबड्यांवर सरकार हाकणारे नेतान्याहू अशाच एखाद्या घटनेची वाट बघत असावेत. त्यांनी राष्ट्रीय अस्मितेचा राग आळवत पॅलेस्टाईनला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. शाळा, धर्मस्थळे, रुग्णालये असा कुठलाही मुलाहिजा न बाळगता इस्राईलने निरंकुश कत्तल करून आपला बदला घेतला. आता १० महिने उलटून गेल्यानंतरही नेतान्याहू आपल्या प्रतिशोधाला पूर्णविराम देताना दिसत नाहीत.

मागील आठवड्यात इस्राईल-सीरियाच्या सीमेवर असणाऱ्या ''गोलान हाईट्स'' पठारावर झालेल्या हल्ल्यात इस्राईलची १२ मुले मृत्युमुखी पडली. तो हल्ला लेबेनॉनमधील दहशतवादी गट असलेल्या 'हेजबोल्लाह'ने केल्याचा ठपका इस्राईलने ठेवला. आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच इस्राईलने लेबेनॉनच्या राजधानीत हवाई हल्ला करत ''हेजबोल्लाह''च्या वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या केली. हे कमी म्हणून की काय, याच सुमारास ''हमास''चे प्रमुख इस्माईल हनियेह हे इराणच्या भेटीवर असताना, इराणची राजधानी असलेल्या तेहरान शहरातील शासकीय निवास्थानात त्यांचा खून करण्यात आला. तो खून आपण केल्याची कबुली इस्राईलने दिली नसली तरी नेतान्याहू सरकारमधील मंत्र्यांच्या प्रतिक्रिया तेच सूचित करतात.

''हेजबोल्लाह''सारख्या खमक्या आणि बऱ्यापैकी संघटित असलेल्या गटाच्या वरिष्ठाचा काटा काढल्याने त्या गटात सूडाची भावना जोर धरत आहे. तर दुसरीकडे, आपल्या देशामध्ये मानाचा पाहुणा म्हणून निमंत्रित केलेल्या इस्माईल हनिये यांचा खून इराणच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. वरील दोन्ही खून हे त्या त्या सार्वभौम देशाच्या थेट राजधानीत, तगड्या सरकारी सुरक्षेला भेदून केल्यामुळे त्याचा झटका मोठा समजला जात आहे. ''हमास'', ''हेजबोल्लाह'', ''हुती'' अशा दहशतवादी गटांचा पुरस्कार करणारा इराणच सुरक्षित नाही, ही बाब गंभीर आहे. पाल्यासमोरच पालकाने मार खावा अशी इराणची अवस्था झाली आहे. त्यामुळे, नाईलाजाने इराण इस्राईलवर हल्ला करू शकतो. आता इराण पश्चिम आशियाभर पसरलेल्या आपल्या प्याद्यांकरवी इस्राईलशी युद्ध छेडतो की थेट दोन हात करतो हे बघणे बाकी आहे. जी गोष्ट इराणची तीच लेबेनॉनची. गेले १० महिने इस्राईल-हमास संघर्ष सुरु असताना लेबेनॉन अथवा तेथील ''हेजबोल्लाह''ने त्यात थेट सहभाग घेतला नाही. २००६ नंतर लेबेनॉन-इस्राईलमध्ये थेट युद्ध झाले नाही. आधीच डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला अजून ओहोटी नको म्हणून सावध पवित्र घेणाऱ्या ''हेजबोल्लाह''शी इस्राईलने कुरापत काढल्याचे चित्र दिसत आहे.

युद्धामुळे येणारी सर्व प्रकारची अस्थिरता कोणत्याही राष्ट्राला सहज परवडण्यासारखी नसते. युद्ध सुरु करणे सोपे असले तरी ते थांबवणे तितकेच अवघड असते. फक्त एक युद्ध देशाच्या अर्थव्यवस्थेची मान टाकायला पुरेसे ठरते. अशा वेळी लेबेनॉन आणि इराण या देशांमध्ये हल्ला करून इस्राईलने युद्धाच्या आणखी दोन आघाड्या उघडायला संमती दिल्यासारखे आहे. पॅलेस्टाईनसोबत सुरू असलेला संघर्ष थंड होत नसताना त्यात आणखी दोन ठिकाणी पेटू पाहणाऱ्या रणामुळे संपूर्ण पश्चिम आशियात धोक्याची घंटा घणघणू लागली आहे. दिवसेंदिवस मरण पावलेल्या, जखमी झालेल्या आणि विस्थापित होणाऱ्या नागरिकांचा आकडा फुगत असताना नेतान्याहू यांनी सामंजस्य दाखवावे म्हणून अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांनी प्रयत्न करून पहिले. नेतान्याहू ऐकत नाहीत हे समजल्यावर त्यांनी अमेरिकी शस्त्रांची एक तुकडी रोखून पहिली. मात्र, लेबेनॉन आणि इराणला युद्धात ओढून अमेरिका यातून बाजूला होऊच शकणार नाही, असा प्रयत्न नेतान्याहू करीत आहेत.

लोकप्रियता घसरणीला
इस्राईलमधील एका वर्गाचा नेतान्याहू आणि त्यांच्या वाढत्या युद्धखोर भूमिकेला विरोध आहे. सरकारी तिजोरी, युद्धाला कंटाळलेली लोकभावना यांची तमा न बाळगता राष्ट्रभावनेचा यज्ञकुंड सुरु ठेवणाऱ्या नेतान्याहू यांची लोकप्रियता घसरत असून ते पुढील निवडणुकीत मार खातील, असे काही सर्वेक्षणांमध्ये समोर आले आहे. युद्धप्रसंग रेटून नेतान्याहू ते टाळण्याची खटपट करीत आहेत. इस्माईल हनिये हे ''हमास''च्या राजकीय फळीचे प्रमुख असले तरीही ते कट्टरवादी गटात मोडले जात नव्हते. संघर्षात ''हमास''च्या वतीने सामोपचाराची बोलणी हनिये करीत होते. या ताज्या युद्धात त्यांना स्वतःच्या तीन मुलांचा आणि चार नातवांचा बळी द्यावा लागला आहे. शांततेची बोलणी करणाऱ्यालाच मारून नेतान्याहू यांनी आपले युद्धप्रिय धोरण स्पष्ट केले आहे. अध्यक्षीय निवडणुकीचे वर्ष असणाऱ्या अमेरिकेत, व्यवस्थेच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर आपले वजन राखणाऱ्या ज्यू लोकांची नाराजी ओढवून घ्यायला नको म्हणून जो बायडेन आणि कमला हॅरिस इस्राईलची पाठ राखण करीत आहेत. मात्र, त्यामुळे नेतान्याहू यांसारख्या पुढाऱ्यांचे मनोधैर्य वाढत असून पश्चिम आशियातील परिस्थिती हाताबाहेर जात त्याची निर्नायकीकडे वाटचाल सुरु आहे.

या ताज्या संघर्षासोबतच, गेली अडीच वर्ष सुरु असलेले रशिया-युक्रेन युद्ध, फ्रान्सच्या संसदीय निवडणुकीनंतर तेथील अस्थिरता, ब्रिटनमध्ये वरचेवर डोके वर काढणारे हिंसक मोर्चे, बांगलादेशातील बंडाळी, पाकिस्तानातील खिळखिळी व्यवस्था, आफ्रिकी राष्ट्रांतील बेबनाव, व्हेनेज्युएलासारख्या दक्षिण अमेरिकी राष्ट्रांत जाणवू लागलेला असंतोष आणि तैवानच्या रोखाने फणा काढून बसलेला चिनी ड्रॅगन हे आजच्या आंतरराष्ट्रीय ''सुसंवाद'' आणि ''सामंजस्याचे'' वास्तव आहे. या कुठल्याही प्रकरणाचा तार्किक शेवट होताना दिसत नाही. यदा कदाचित जरा शांतता नांदते आहे असे दिसले तरी ते फक्त मृगजळ असते हे इतिहासाने एव्हाना सिद्ध केले आहे. अशी भयानक परिस्थिती असताना आज तरी फक्त युद्धज्वाळा दिसत आहेत.
 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter