एक कहाणी : दिल्लीच्या मौलाना जुबैर कुरैशी नावाच्या महागड्या मास्तरांची

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 12 h ago
मौलाना जुबैर कुरैशी
मौलाना जुबैर कुरैशी

 

मलिक असगर हाशमी

त्या काळात पुरानी दिल्लीत आजच्यासारखा गदारोळ अन् व्यापाराची पळापळ नव्हती. लोकवस्ती कमी होती, पण लोकांचा शिक्षणाशी फारसा संबंध नव्हता. अशा काळात तिथे मौलाना जुबैर कुरैशी नावाचे एक अवलिया शिक्षक राहायचे.

मौलाना जुबैर हे काही साधेसुधे मास्तर नव्हते. ते कुरैशी स्कूल ऑफ लँग्वेजेस नावाचा इंग्रजी शिकवणारा एक मदरसा चालवायचे. त्या काळात त्यांची फी असायची तब्बल १०० रुपये! आजच्या हिशोबाने बोलायचे तर ही रक्कम जवळजवळ १० हजार रुपयांच्या बरोबरीची भरते.

दिल्लीतील लोक त्यांना अतिशय महागडा मास्तर म्हणून हाक मारायचे. पण या १०० रुपयांच्या फीमागे एक भन्नाट विचार दडला होता. याच विचाराने पुढे जाऊन पुरानी दिल्लीतील शेकडो मुलांचे भविष्य उजळवले.

स्वातंत्र्य सैनिकांना न जमलेले काम मी २ महिन्यांत केले!
या रंजक कथेचा पडदा बाजूला सारला, की समजते मौलाना जुबैर कुरैशी हे दुसरे तिसरे कोणी नसून भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त आणि वरिष्ठ आयएएस अधिकारी शहाबुद्दीन याकूब कुरैशी म्हणजेच एस. वाय. कुरैशी यांचे वडील होते!

एस. वाय. कुरैशी यांचा जन्म देश स्वतंत्र होण्याच्या अवघ्या २ महिने आधी, ११ जून १९४७ रोजी पुरानी दिल्लीच्या ऐतिहासिक वातावरणात झाला. गिटार वाजवण्याची आवड असलेले अन् दिलखुलास जगणारे कुरैशी आज आठवण सांगताना मिश्किलपणे म्हणतात, "मोठमोठ्या स्वातंत्र्य सैनिकांना जे जमले नाही, ते काम मी जगात आल्यावर अवघ्या दोन महिन्यांत करून दाखवले--देश स्वतंत्र झाला!"

कुरैशी कुटुंबाचे दिल्लीशी नाते काही नवीन नाही. जवळपास ५०० वर्षांपासून त्यांची मुळे या मातीत रुजलेली आहेत. या घराण्याने देशाला अनेक विद्वान अन् शिक्षणतज्ज्ञ दिले. १९४७ मध्ये फाळणी झाली, तेव्हा कुटुंबातील काही नातेवाईक सीमेपलीकडे पाकिस्तानला गेले. पण एस. वाय. कुरैशी यांच्या आजोबांनी अन् वडिलांनी आपली मातृभूमी सोडण्यास साफ नकार दिला. आपल्या पूर्वजांच्या आठवणी ज्या मातीत जपल्या आहेत, ती माती सोडून जाणे शक्यच नाही, असे त्यांचे ठाम मत होते.
 

साठव्या वर्षी शिकले जर्मन भाषा!
मौलाना जुबैर कुरैशी यांना इंग्रजी व्याकरणाचे एक वेगळेच वेड होते. पुरानी दिल्लीतील तीन-तीन पिढ्यांनी त्यांच्याकडून इंग्रजीचे धडे घेतले. वाढत्या वयासोबत त्यांचे हे वेड मुळीच कमी झाले नाही.

वयाच्या साठीत जेव्हा ते काठीचा आधार घेऊन चालू लागले, तरीही त्यांची पावले मॅक्स म्युलर भवनाकडे (ग्योथे इन्स्टिट्यूट) वळायची. प्रसिद्ध भारतीय अभ्यासक फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांच्या आठवणीत हे जर्मन सांस्कृतिक केंद्र सुरू झाले होते.

तिथे जाऊन त्यांनी वयाच्या ६० व्या वर्षी स्वतः जर्मन भाषा शिकून घेतली. मग आपल्या शाळेत सोप्या पद्धतीने जर्मन व्याकरण शिकवायला सुरुवात केली. '६४ टेन्स' या त्यांच्या अनोख्या फॉर्मुल्याने ते इंग्रजी आणि जर्मन दोन्ही भाषांमधील अडचणी चुटकीसरशी सोडवून द्यायचे. पुढे जाऊन त्यांचे सुपुत्र एस. वाय. कुरैशीसुद्धा याच मॅक्स म्युलर भवनाशी जोडले गेले.

१०० रुपयांच्या फीमागील अजब गणित!
पण त्या १०० रुपये फी मागचे नेमके रहस्य काय होते? एस. वाय. कुरैशी यांनी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'इंडिया अँड आय: ए हंड्रेड मेमरीज...' (India and I: A Hundred Memories, Not a Memoir) या पुस्तकात या गुपितावरून पडदा उठवला.

त्यांचे वडील महिनाभर रोज एक तास शिकवण्याचे १०० रुपये घ्यायचे, पण त्यांचे गणित थोडे वेगळे होते. वर्गात जर १च मुलगा असेल, तर फी १०० रुपये असायची. जर २ मुले आली, तर ५०-५० रुपये. आणि जर वर्गात ५० मुले एकत्र आली, तर प्रत्येकाच्या वाट्याला अवघे २-२ रुपये यायचे!

या क्लृप्तीमागे मौलानांचा एकच हेतू होता, पुरानी दिल्लीतील जास्तीत जास्त मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे. मुले एकत्र आली की फी स्वस्त होईल आणि कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, हे ते ओळखून होते. माणसाला एकदा कोणत्याही भाषेचे व्याकरण समजले, की तो जगातील कोणतीही भाषा शिकू शकतो, असा त्यांचा विश्वास होता. त्यांच्या या ज्ञानाच्या मंदिरात हिंदू अन् मुस्लिम दोन्ही धर्मांची मुले एकत्र शिकायची.

वडिलांच्या याच ज्ञान, शिस्त अन् दूरदृष्टीच्या छायेत लहानाचे मोठे होऊन एस. वाय. कुरैशी आणि त्यांची बहीण, दोघेही भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले. मौलाना जुबैर कुरैशी यांनी पुरानी दिल्लीच्या अरुंद गल्लीबोळांत शिक्षणाची जी ज्योत लावली होती, तिचा प्रकाश आजही इतिहासाच्या पानांवर लखलखतो आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter