स्वराज्यासोबतच सौहार्दाचे महत्त्व जाणणारे लोकमान्य टिळक

Story by  पुणे | Published by  Mrudgandha Dixit • 5 h ago
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

 

१ ऑगस्ट. 'भारतीय असंतोषाचे जनक' आणि स्वराज्याची सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी. शालेय पाठ्यपुस्तकांपासून ते राजकीय व्यासपीठांपर्यंत टिळकांची प्रतिमा एका जहाल नेत्याची आणि प्रखर राष्ट्रवाद्याची म्हणून प्रस्थापित झाली आहे.

परंतु, १८८० ते १९२० या चाळीस वर्षांच्या अखंड सार्वजनिक प्रवासाकडे पाहिले, तर टिळकांचे असे काही वेगळे, प्रगल्भ आणि आंतरराष्ट्रीय परिमाण असणारे पैलू समोर येतात जे सामान्यतः दुर्लक्षित राहिले आहेत. तुरुंगातील त्यांचे अथांग ग्रंथवाचन, डाव्या-कामगार चळवळींशी जोडलेला धागा आणि हिंदू-मुस्लीम सौहार्दाची आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी. या सर्व गोष्टींमुळेच महात्मा गांधींनी टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करताना म्हटले होते, "लोकमान्य हे महासागरासारखे आहेत."

मंडालेतील खडतर कैदेत ऋग्वेदाचा प्रकाश आणि 'गीतारहस्य' निर्मिती

१८९८ मध्ये राजद्रोहाच्या पहिल्या खटल्यात शिक्षा झाल्यावर टिळकांच्या उत्तुंग विद्याव्यासंगाची आदरपूर्वक नोंद घेत जर्मन प्राच्यविद्याशास्त्रज्ञ मॅक्सम्युलर यांनी संपादित केलेली ऋग्वेदाची प्रत त्यांना तुरुंगात पाठवली.

तुरुंगातून सुटल्यावर मित्रमंडळींशी गप्पा मारताना टिळक सहज म्हणाले, "मॅक्सम्युलर साहेबांनी पाठवलेला ऋग्वेद जवळ असल्यामुळे दिवस मोठे आनंदात गेले." यावर आश्चर्याने एका मित्राने विचारले, "दादा, तुरुंगात कसला आलाय आनंद?" तेव्हा टिळकांनी दिलेले उत्तर अत्यंत मार्मिक होते:

"तो आनंद तुम्हाला तुरुंगात गेल्याशिवाय आणि ऋग्वेद वाचल्याशिवाय कळणार नाही!"

१९०८ मध्ये वयाची पन्नाशी उलटलेली असताना आणि मधुमेहाचा त्रास जडलेला असताना टिळकांना मंडालेच्या तुरुंगात ६ वर्षांसाठी धाडण्यात आले. तेथे त्यांनी फ्रेंच आणि जर्मन विचारवंतांचे मूळ ग्रंथ वाचण्यासाठी आधी भाषाविषयक पुस्तकांच्या मदतीने या भाषा आत्मसात केल्या. 

मंडालेत बंदिवासात असतानाच त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई यांचे निधन झाले, तरीही मनातले दुःखावेग बाजूला ठेवून त्यांनी 'गीतारहस्य' हा अजरामर ग्रंथ लिहून पूर्ण केला.

याच मंडालेच्या तुरुंगाला पुढे १९२५ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भेट दिली. तिथल्या अस्वस्थ करणाऱ्या हवेत टिळकांचे ज्ञानसाधनेचे दिवस आठवून सुभाषबाबूंनी भावूक होऊन लिहिले होते:

"जगापासून दूर अशा तुरुंगात, शरीराच्या दुर्बल अवस्थेत ग्रंथवाचनात आणि ग्रंथलेखनात रंगून जाणे हे टिळकांसारख्या ज्ञानयोग्यालाच शक्य होते... It was the holiest Pilgrimage of my life (माझ्या आयुष्यातील ही सर्वात पवित्र यात्रा होती)."

लंडनची ऐतिहासिक सभा, जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि लेनिन यांची उत्सुकता

१९०५ नंतर आणि विशेषतः रशियन क्रांतीनंतर टिळकांना समजले होते की कामगारवर्ग ही देशातील एक मोठी सामाजिक शक्ती आहे.

१९१९ मध्ये टिळक एका वकिली खटल्याच्या निमित्ताने लंडनमध्ये होते. तेथे ब्रिटिश लेबर पार्टीच्या (मजूर पक्ष) आणि तेथील ट्रेड युनियन्सच्या एका मोठ्या सभेला ते प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहिले. विशेष म्हणजे या सभेत प्रसिद्ध विचारवंत जॉर्ज बर्नार्ड शॉ हेही एक वक्ते होते. भारतात परतल्यानंतर टिळकांनी मजूर पक्षाला २००० पौंडांची देणगी पाठवून आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीशी भारताचा संबंध जोडला.

टिळकांच्या या डाव्या आणि कामगारविषयक दृष्टिकोनावर रशियन क्रांतीचे प्रणेते व्ह्लादिमीर लेनिन यांची बारीक नजर होती. लेनिन यांनी केवळ 'टिळक कोण?' एवढीच चौकशी केली नाही, तर ब्रिटिश कम्युनिस्ट पार्टीच्या आपल्या सहकाऱ्यांना लंडनमध्ये टिळकांना भेटण्याचे निर्देश दिले. 

याच आंतरराष्ट्रीय बंधुभावाची आठवण म्हणून आजही लंडनमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात लोकमान्य टिळकांचे छायाचित्र आदरपूर्वक लावलेले पाहायला मिळते.

लखनौ कराराचा ऐतिहासिक दस्तऐवज आणि बॅरिस्टर जिनांची साथ

१८८० ते १९०० या पूर्वार्धात महाराष्ट्रात शिक्षण आणि 'केसरी'-'मराठा' वृत्तपत्रांद्वारे प्रबोधन करणारे टिळक उत्तरार्धात राष्ट्रीय स्तरावर 'टिळक पर्व' म्हणून उदयास आले. या काळात त्यांचा सर्वात मोठा राजकीय पैलू म्हणजे हिंदू-मुस्लीम सौहार्दाचा पुरस्कार.

१८९० च्या दशकात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करताना टिळकांनी त्या काळातील 'मोहरम'च्या मिरवणुका, संघटन आणि ताबूतांच्या लोकसहभागाची प्रेरणा घेतली होती, हे इतिहासकार डॉ. रिचर्ड कॅशमन यांनी स्पष्ट केले आहे. 

१८९३-९४ च्या दंगलीनंतर टिळकांनी 'केसरी'तून मुस्लिमांना दोष न देता ब्रिटिशांच्या 'फोडा आणि झोडा' नीतीवर कडाडून टीका केली होती.

१९१६ च्या लखनौ करारात (Lucknow Pact) टिळक आणि बॅरिस्टर जिना यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. काँग्रेसमधील काही नेत्यांचा मुस्लिमांसाठीच्या स्वतंत्र मतदारसंघाला विरोध असताना टिळकांनी ठामपणे पाठिंबा दिला. ते म्हणाले होते:

"आपल्या मुस्लीम भावांना काही सवलती जास्त मिळाल्या, तरी त्यात गैर काही नाही. ब्रिटिशांविरुद्ध लढताना आपण एकत्र असणे हे सर्वात महत्त्वाचे आहे."

हसरत मोहानींचे राजकीय गुरू आणि आजारी टिळकांची खिलाफत चळवळ

उत्तर भारतातील 'इन्कलाब झिंदाबाद'चा नारा देणारे मौलाना हसरत मोहानी टिळकांना आपले 'राजकीय गुरू' मानत असत. १९०७ च्या सुरत अधिवेशनात जेव्हा काँग्रेसमध्ये फूट पडली, तेव्हा हसरत मोहानी आणि उत्तर भारतातील मुस्लीम तरुण टिळकांच्या जहाल गटासोबत खंबीरपणे उभे राहिले.

ऑगस्ट १९२० मध्ये टिळक आपल्या आयुष्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आजारी असताना, मौलाना शौकत अली पुण्यातील 'सरदार गृह' येथे त्यांना भेटायला आले. खिलाफत चळवळीला पाठिंबा मागताना आजारी टिळकांनी शौकत अली यांना जवळ बोलावले आणि अत्यंत ठामपणे सांगितले:

"माझे डोकं आणि माझे हृदय पूर्णपणे तुमच्या चळवळीसोबत आहे. माझे मुस्लीम बांधव जर ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरत असतील, तर माझा आणि माझ्या पक्षाचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा असेल."

लोकनेत्याचा लोककल्याणकारी व सर्वसमावेशक विचार

२४ व्या वर्षी न्यू इंग्लिश स्कूल, फर्ग्युसन कॉलेज आणि 'केसरी'-'मराठा'च्या माध्यमातून लोकशिक्षणाचा श्रीगणेशा करणाऱ्या टिळकांनी आयुष्याची चार दशके देशकार्यासाठी वेचली. त्यातील साडेसात वर्षे त्यांनी अत्यंत खडतर तुरुंगवासात घालवली.

लोकमान्य टिळक हे केवळ घोषणा देणारे नेते नव्हते. ते ज्ञानयोगी होते, कामगार चळवळीचे दृष्टे पाठीराखे होते आणि हिंदू-मुस्लीम ऐक्याची गरज ओळखणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुत्सद्दी होते. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त या सर्वसमावेशक वारशाचे स्मरण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.



Latest News