महाराष्ट्रातील भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीप्रथा, परंपरा यांविरोधात या संतांनी प्रखर भूमिका घेतली. संत नामदेव, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यापासून सुरु झालेली ही प्रबोधनाची परंपरा आधुनिक काळात संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांनी सुरु ठेवली. या परंपरेत शेख महमंद यांच्यासारखे मुस्लीम संतांचेही मोठे योगदान राहिले आहे. हिंदू-मुस्लीम सौहार्दाची ही परंपरा मोठी आहे.
धार्मिक तेढ, भेदभाव, विषमता नष्ट करण्यासाठी आणि लोकजागृतीसाठी या परंपरेने भारुड, भजन, कीर्तन यांचा आधार घेतले. सामाजिक कुप्रथांवर आसूड ओढणारी आणि सामाजिक सौहार्दाची संस्कृती रुजवणारी कीर्तनकारांची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात आजही कीर्तनातून सामजिक प्रबोधन केले जाते. त्यामध्ये हिंदू कीर्तनकारांसोबत मुस्लीम कीर्तनकारही आघाडीवर राहिले आहेत. जैतूनबींपासून सुरु झालेली ही परंपरा पुढे अनेक मुस्लीम कीर्तनकारांनी समर्थपणे पेलली आहे. त्यातीलच एक महत्त्वाचे नाव म्हणजे ह.भ.प. कबीर महाराज अत्तार!
महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि तेलंगण राज्यात कबीर महाराजांनी कीर्तनसेवा केली आहे. पांढरे शुभ्र धोतर, अंगात नेहरू शर्ट, जॅकेट, फेटा असा त्यांचा पेहराव. महाराजांचे आजोबा बाबुलालभाई हसनभाई अत्तार हे स्वातंत्र्यसैनिक. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व चळवळीमध्ये हुतात्मा बाबू गेनू यांचे अंगरक्षक म्हणून काम पाहिलेले. वडील नूरमहंमद अत्तार हे कीर्तनकार आहेत आणि जुन्या काळात पैलवानकी केली. वडील कीर्तन करत असल्याने कबीर महाराज आणि त्यांच्या चार बहिणींना लहानपणी सामाजिक संघर्ष करावा लागला. अत्तार कुटुंबीयांनी भागवत धर्माची पताका हाती घेतल्याने चार बहिणींची लग्न जमण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या, अनेकदा बहिणींसाठी आलेले स्थळ हे वडील कीर्तन करतात समजल्यानंतर पाठ फिरवायचे. परिस्थिती हलाखीची असताना वडिलांनी या पाच भावंडांना शिकवले आणि मोठे केले. चार बहिणींचा योग्य वर पाहून विवाह करून दिला.
प्रतिकूल परिस्थितीत वडील नूर महंमद अत्तार यांनी प्रपंच उभा केला. आपल्या वडिलांकडून आणि आळंदी येथे कबीर महाराज यांनी कीर्तनाचे धडे घेतले. अत्तार कुटुंबीय शाकाहारी आणि माळकरी आहे. हे करत असताना कबीर महाराज आपल्या धर्मातील रमजान ईद, बकरी ईद आणि ईद-ए-मिलाद या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित राहतात आणि नमाज पठण करतात. प्रारंभी कबीर महाराज हे येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जात पडताळणी कार्यालयात नोकरीला होते त्यानंतर त्यांनी खेडशिवापूर येथील एका खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून नोकरी केली. परंतु बीसीए शिक्षण घेतलेल्या अत्तार यांना अंगभूत कीर्तनकला स्वस्थ बसून देत नव्हती. त्यामुळे २०१३ पासून म्हणजेच वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी कीर्तनात करण्याचा निर्णय घेतला होता.
आतापर्यंत त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, अहिल्यादेवी, सावित्रीबाई फुले, सावता महाराज, स्वातंत्र्यसैनिक यांच्यावर कीर्तन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज हे त्यांच्या किर्तनातील जिव्हाळ्याचे विषय, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर पोवाडा म्हणतात, तेव्हा उपस्थितांच्या अंगावर शहारे उभे राहतात. सांप्रदायाच्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या दोन्ही मुलीची नावे ज्ञानेश्वरी आणि मुक्ताई ठेवली आहेत. तर त्यांची टोपणनावे समीरा (संत मीरा) आणि साईमा अशी ठेवली आहेत. सामाजिक योगदानाबद्दल कबीर महाराजांना आतापर्यंत अनेक सामाजिक पुरस्कार मिळाले आहेत.
सोशल मीडियावर लोकप्रियता
कबीर महाराजांची कीर्तने, प्रवचने व व्याख्याने ही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत. सोशल मीडियावर त्यांना हजारो फॉलोअर्स आहेत. कमी वयात कीर्तन क्षेत्रात घेतलेली झेप निश्चितच प्रेरणादायी आहे.
त्यांच्या कीर्तनाचे चाहते असलेले प्रकाश शेलार म्हणतात, "खेडशिवापूर (जि. पुणे) येथील ह.भ.प. कबीर महाराज अत्तार या कीर्तनकाराने जातिभेदाच्या भिंती ओलांडत महाराष्ट्रभर व महाराष्ट्राबाहेर आतापर्यंत २५०० कीर्तने, प्रवचने आणि व्याख्याने देत समाजात जनजागृती करण्याबरोबरच अपप्रवृत्तींवर घाला घालण्याचे काम केले आहे."
लोकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल विचारले असता कबीर महाराज म्हणाले, "जात, धर्म जरी वेगवेगळे असले तरी आपण सर्व एकच आहोत. कीर्तनातून व प्रवचनातून जातीय सलोखा जपण्यासाठी व समाजप्रबोधन करण्यासाठी काम करत आहे. धमनि मुस्लिम असूनदेखील माझ्या कीर्तनकलेची दखल संपूर्ण महाराष्ट्रात घेतली जाते. यापेक्षा दुसरे भाग्य कोणते आहे."