बिहारमधील लखीसराय येथे अशोक धाम मंदिरा जवळ चेंगराचेंगरी; सात भाविकांचा मृत्यू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 4 h ago
 लखीसराय येथील अशोक धाम मंदिरा जवळ श्रावण सोमवारी चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्यू झाल्यानंतरचे घटनास्थळ
लखीसराय येथील अशोक धाम मंदिरा जवळ श्रावण सोमवारी चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्यू झाल्यानंतरचे घटनास्थळ

 

लखीसराय 

बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातल्या प्रसिद्ध अशोक धाम मंदिरा जवळ सोमवारी सकाळी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत किमान सात जणांचा मृत्यू झाला असून चौदा जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पवित्र श्रावण महिन्यात भगवान शिवाला जल अर्पण करण्यासाठी हजारो भाविक जमा झाले होते. मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या अशोक धाम रेल्वे स्थानकाजवळ भाविकांची प्रचंड गर्दी जमल्यामुळे ही दुर्घटना घडली.

सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गर्दीचा मोठा ताण आल्यामुळे बॅरिकेड्सचा एक भाग कोसळला, ज्यामुळे लोक एकमेकांवर पडले आणि चेंगराचेंगरी उडाली, असे लखीसरायचे जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार यांनी 'पीटीआई'शी बोलताना सांगितले. घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचे काम प्रशासन करत आहे.

मुख्यमंत्र्यांची शोकसंवेदना आणि मदतीची घोषणा

बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

“लखीसरायमधील अशोक धाम येथील घटना अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. या घटनेने मला तीव्र वेदना झाल्या आहेत. शोकाकुल कुटुंबांप्रति माझ्या संवेदना आहेत. जखमींवर योग्य आणि त्वरित उपचारासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. ईश्वर दिवंगत आत्म्यांना शांतीो आणि जखमींना लवकरात लवकर आरोग्य लाभो,” असे त्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.