भक्ती चाळक
मुस्लीमबहुल मुंब्रा परिसरात यंदा ईद-उल-फित्रचा सण एका खास अंदाजात साजरा करण्यात आला. इथे धार्मिक इबादतसोबतच माणुसकीचे अत्यंत सुंदर उदाहरण पाहायला मिळाले. रमझानच्या पवित्र महिन्यानंतर येणारा हा सण एकत्र येऊन कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. हाच गाभा लक्षात घेऊन ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत मुंब्रा पोलिसांनी कर्तव्य बजावताना एक स्तुत्य उपक्रम राबवला.
मुंब्रा येथील ऐतिहासिक दारुलफलाह मस्जिदीच्या बाहेर नमाज पठण पूर्ण झाल्यानंतर एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. मस्जिदीतून बाहेर पडणाऱ्या मुस्लिमांचे स्वागत करण्यासाठी मुंब्रा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी गुलाबाची फुले घेऊन उभे होते. पोलिसांनी नमाजावरून परतणाऱ्या प्रत्येक नागरिकाला गुलाबाचे फूल देऊन ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
पोलिसांच्या या अनोख्या आणि प्रेमळ अंदाजाने तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि सणाचा आनंद द्विगुणित केला. या मोहिमेत वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः सहभागी झाले होते. मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, डीसीपी सुभाष बुरसे, एसीपी प्रिया डमले यांच्यासह पोलीस आणि ट्रॅफिक विभागाचे अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांनी स्वतः पुढे होऊन नागरिकांना फुले दिली आणि त्यांच्याशी संवाद साधला.
ठाणे पोलिसांनी सोशल मीडियावर या खास क्षणांचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. यामध्ये पोलीस अधिकारी युनिफॉर्ममध्ये दिसत आहेत. हसत मुखाने ते लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना फुले देत आहेत. काही ठिकाणी अधिकारी नागरिकांशी हस्तांदोलन करताना आणि गळाभेट घेतानाही दिसले. या कृतीमागचा उद्देश स्पष्ट करताना ठाणे पोलिसांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, "ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत, ईदच्या नमाजानंतर मुस्लिम बांधवांना गुलाबाची फुले देऊन ईद अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. बंधुभाव, सौहार्द आणि एकतेचा सुंदर संदेश देऊन पोलिसांनी समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे."
स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे. नागरिकांच्या मते असे उपक्रम समाजात एकमेकांप्रती विश्वास निर्माण करतात आणि बंधुभाव वाढवतात. पोलीस आणि जनता यांच्यातील हा सकारात्मक संवाद सामाजिक एकात्मतेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पोलिसांच्या या कृतीतून हेच सिद्ध होते की, त्यांची ही भूमिका कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापुरती मर्यादित नसून, ते समाजाचा एक सक्रिय भाग आहेत. मुंब्रा परिसरात ईदच्या दिवशी दिसलेला हा सलोखा खऱ्या अर्थाने शांतता आणि एकतेचा एक मोठा संदेश देणारा ठरला आहे.