राज्यात मुस्लिम समाज मोठ्या संख्येने आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत या समाजाचे विधानसभेत वीस ते पंचवीस आमदार असायचे. आता ही संख्या नगण्य झाली आहे. आता जे आमदार आहेत, त्यातील बहुतांश परप्रांतीय आहेत. त्यामुळे विधानसभेच्या आगामी निवडणुकीत राज्यात मुस्लिम समाजाला किमान ४० जागा मिळाव्यात, अशी मागणी या समाजाच्या नेत्यांतून होताना दिसत आहे. यासाठी मराठवाड्यातील काँग्रेसमधील मुस्लिम नेते एकवटले आहेत. मंगळवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये याबबत बैठकही घेण्यात आली.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीला मुस्लिम समाजाने एकगठ्ठा मतदान केले आहे. हा समाज सातत्याने काँग्रेस तसेच सध्याच्या महाविकास आघाडीच्या बाजूने ठामपणे उभा राहिला आहे. तरीही समाजाला प्रतिनिधित्व दिले जात नाही, याबद्दल या बैठकीत खंत व्यक्त करण्यात आली. त्यामुळे विधानसभेच्या आगामी निवडणुकीत समाजाला अधिक जागा द्याव्यात अशी मागणीही बैठकीत पुढे आली.
या विषयी बोलताना काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मोईज शेख म्हणाले, "राज्यात प्रतिनिधित्व देताना अन्याय केला जात असल्याची मुस्लिम समाजाची भावना आहे. यातूनच मराठवाड्यातील काँग्रेसचे मुस्लिम नेते एकत्र आले होते. विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या संदर्भानेही चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीकडे ४० जागांची मागणी आहे. दहा ऑगस्टला लातूर येथे काँग्रेसची विभागीय बैठक होत आहे. त्यावेळी वरिष्ठांची भेट घेतली जाणार आहे. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेऊन ही मागणी केली जाणार आहे."
या बैठकीला माजी आमदार एम. एम. शेख, माजी आमदार सिराज देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोईज शेख (लातूर), मराठवाडा विभागीय अध्यक्ष हमद चाऊस (छत्रपती संभाजीनगर), युसूफ शेख, धाराशिव जिल्ह्याचे कार्याध्यक्ष खलील सय्यद, माजी महापौर अब्दुल सत्तार शेख (नांदेड), माजी उपमहापौर मसूद शेख यांची विशेष उपस्थिती होती.
या सोबतच प्रदेश सरचिटणीस हाफिज शेख (हिंगोली), प्रदेश सचिव खालेद पठाण, प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम पठाण, प्रदेश सरचिटणीस कैसर आझाद (सिल्लोड), शकील मौलवी, रशीद मामू, अरेफ शेख, माजी नगरसेवक नादेरुल्लाह हुसेनी, उपनगराध्यक्ष मोईनुद्दीन पठाण, मुहीब अहेमद, हमीद नवाज अख्तर, अयुब शेख, माजी नगरसेवक शेर अली (नांदेड), शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार (परभणी), फरीद देशमुख, डॉ. सर्ताज पठाण, रोटी बँकेचे प्रणेते युसूफ मुकाती, गुलाब पटेल, मजहर पटेल, युसूफ हिरा पटेल आदी या बैठकीला उपस्थित होते.