नदिमार्ग हत्याकांडातील निष्पापांना श्रद्धांजली वाहताना काश्मीरी पंडित आणि मुस्लीम
नदिमार्ग हत्याकांडाला २३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर काश्मीरी पंडितांनी पुन्हा एकदा त्याच शोकांतिकेच्या ठिकाणी जात निष्पापांना श्रद्धांजली वाहिली आहे. एका अत्यंत हृदयस्पर्शी भावनेतून स्थानिक मुस्लीमही या प्रार्थनेत सहभागी झाले. या कृतीतून त्यांनी एकजुटीचा आणि माणुसकीचा एक शक्तिशाली संदेश जगाला दिला आहे.
गेल्या दोन दशकांपासून हा स्मृतीदिन इतरत्र पाळला जात होता. मात्र यावेळी विस्थापित पंडितांनी नदिमार्ग गावात प्रत्यक्ष घटनास्थळी एकत्र येऊन प्रार्थना केली. या निर्णयामुळे हे स्मारक आता सलोखा आणि बंधुत्वाचे एक हळवे प्रतीक बनले आहे.
याप्रसंगी आपली भावना व्यक्त करताना काश्मीरी पंडित भूषण लाल यांनी माध्यमांजवळ भावना व्यक्त केली. ते म्हणाले, "हा आमच्यासाठी एक काळा दिवस आहे. येथे प्राण गमावलेल्या २४ व्यक्तींचे आम्ही सदैव स्मरण करू आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत त्यांच्या बलिदानाचा आदर राखू. आमचा शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांच्या स्मृती आमच्यासोबत राहतील. तसेच या अमानवीय कृत्यासाठी जबाबदार असलेल्यांनाही आम्ही कधीच विसरणार नाही."
दोन्ही समुदायातील सहभागी लोकांनी एकमेकांमधील बंध आजही भक्कम आणि चिरंतर असल्याचे अधोरेखित केले. स्थानिक मुस्लिमांनीही आपली साथ दर्शवत सांगितले की, त्यांचा सहभाग हा आदराचा एक मनापासूनचा प्रयत्न आणि शांततेप्रती असलेल्या बांधिलकीचा पुनरुच्चार आहे.
माजी आमदार एजाज अहमद मीर म्हणाले, "२३ मार्च रोजी मारल्या गेलेल्या त्या २४ निष्पाप व्यक्तींना आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्या लोकांचा कोणताही दोष नव्हता. ती घटना काश्मीरच्या इतिहासावर लागलेला एक डाग आहे, जी जखम अद्याप भरून आलेली नाही. माझा असा विश्वास आहे की मुस्लीम समुदाय नेहमीच पंडितांच्या पाठीशी उभा राहिला आहे."
ते पुढे म्हणाले की, "आज आजूबाजूला पहा, किती लोक त्यांच्या समर्थनासाठी येथे जमले आहेत. माझ्या मते पंडितांशिवाय काश्मीर नेहमीच अपूर्ण आहे. आजही मला वाटते की त्यांनी आपल्या घरी परत यावे आणि पुन्हा येथे राहावे. त्यांच्या स्थलांतरामुळे काश्मीरमधील बंधुभावावर खोलवर परिणाम झाला. तो एक भीषण काळ होता, जेव्हा भीती आणि हिंसाचाराचे राज्य होते आणि सामान्य माणसांकडे फारसे पर्याय उरले नव्हते."