निंबूतच्या गावकऱ्यांनी मुस्लिम जोडप्याला दिला श्रीरामाला मुकुट चढवण्याचा मान

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 22 h ago
तौफीक सय्यद आणि त्यांच्या पत्नी श्रीरामाच्या मूर्तीवर मुकुट चढवताना
तौफीक सय्यद आणि त्यांच्या पत्नी श्रीरामाच्या मूर्तीवर मुकुट चढवताना

 

भक्ती चाळक 

आजकाल आपण सकाळी वृत्तपत्र उघडतो किंवा सोशल मीडिया स्क्रोल करतो, तेव्हा अनेकदा जाती-धर्माच्या नावावर एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले गट, विखारी भाषणे आणि द्वेषाचे राजकारण पाहायला मिळते. समाजात धर्माच्या भिंती इतक्या उंचावत गेल्यात की, शेजारचा माणूस कोणत्या धर्माचा आहे यावरून त्याच्याशी वागण्याचे निकष ठरवले जाऊ लागलेत. अशा गढूळ वातावरणात पुण्याच्या निंबूतमध्ये घडलेली एक घटना सुखद देणारी आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात निंबूत नावाचे एक छोटेसे गाव आहे. या गावाने नुकतीच अशी एक कामगिरी केलीये ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात व्हायला हवी. देशभरात रामनवमीचा उत्साह जोरदार सुरु असताना, निंबूतमध्ये एका मुस्लिम जोडप्याने प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर चांदीचा मुकुट चढवून एक नवा इतिहास रचला आहे.

नेमकी घटना काय?
रामनवमी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण. या दिवशी प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. निंबूत गावातील नवनिर्मित देखण्या राम मंदिरात यावर्षीची रामनवमी विशेष होती. मंदिरात राम दरबार, राधा-कृष्ण आणि हनुमान अशा एकूण सात भव्य मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. रामनवमीच्या निमित्ताने या मूर्तींच्या मस्तकावर चांदीचे कलाकुसर केलेले मुकुट अर्पण करण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

साधारणपणे अशा धार्मिक विधींमध्ये त्याच धर्माच्या प्रमुखांना किंवा पुजाऱ्यांना मान दिला जातो. मात्र निंबूतमध्ये परंपरेला छेद देत एक क्रांतिकारी पाऊल उचलले गेले. गावातील तौफीक शाबुद्दीन सय्यद आणि त्यांच्या पत्नी परवीन सय्यद यांना प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर मुकुट चढवण्याचा मान देण्यात आला. एका मुस्लिम जोडप्याने हिंदूंच्या आराध्य देवतेची अशा प्रकारे सेवा करणे, ही घटना आजच्या काळात अत्यंत दुर्मिळ आणि तितकीच महत्त्वाची आहे. हे दृश्य पाहण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र आले होते.

या ऐतिहासिक बदलामागील संकल्पना
या अभूतपूर्व घटनेच्या मागे सतीश शिवाजीराव काकडे यांची दूरदृष्टी आणि संकल्पना आहे. सतीश काकडे हे गावाच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर असतात. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे आणि गावात धार्मिक सौहार्द टिकवून ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. गावाचा विकास करताना केवळ रस्ते आणि पाणी नव्हे, तर लोकांची मनेदेखील जोडणे महत्त्वाचे आहे, हे त्यांनी ओळखले.

काकडे यांनी गावात ‘एक मंदिर आणि एक मस्जिद’ हा उपक्रम राबवला आहे. या संकल्पनेमागचा त्यांचा उद्देश स्पष्ट करताना ते म्हणतात, “पुढारी मंडळी निवडणुका आल्या की मतांसाठी जातीवाद पसरवतात. लोकांची दिशाभूल करतात. पण माझ्या लेखी मंदिर काय आणि मस्जिद काय, सर्वांचा ईश्वर एकंच.ईश्वर धर्म बघत नाही, तो फक्त श्रद्धा बघतो, हे मला सिद्ध करायचं होतं. म्हणूनच मी ठरवलं की, जर मशीद आणि मंदिर शेजारी-शेजारी असू शकतात, तर त्यांचे उत्सवही एकमेकांच्या हातून साजरे होऊ शकतात.”
 

काकडे यांच्या या संकल्पनेला बळ मिळाले ते थेट सत्तेतून. या दोन्ही वास्तूंच्या उभारणीसाठी दिवंगत नेते अजित पवार यांनी भरघोस निधी दिला. मस्जिदीसाठी ५५ लाख आणि राम मंदिरासाठी ६० लाख रुपयांचा सरकारी निधी वापरून, त्यात ग्रामस्थांनी आणि स्वतः काकडे यांनी भर घातली. आज निंबूतमध्ये ८० लाखांची मशीद आणि ८५ लाखांचे राम मंदिर एकमेकांच्या शेजारी दिमाखात उभे आहेत.

“हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण”
मूर्तीवर मुकुट चढवणाऱ्या ज्या तौफीक सय्यद यांना हा अनुभव मांडण्यासाठी शब्द कमी पडत होते. आजच्या समाजात लोक एकमेकांच्या धार्मिक स्थळांकडे बघायलाही घाबरतात, तिथे मुस्लिम कुटुंबाला गावाने दिलेला हा सन्मान खूप मोठा असल्याचे ते सांगतात. 

आपल्या भावना व्यक्त करताना तौफीक म्हणतात, “समाजात जातीपातीचं टोकाला गेलेलं राजकारण पाहून भीती वाटते. पण माझ्या गावात आम्ही कधीच भेदभाव अनुभवला नाही. पत्नीच्या सोबतीने श्रीरामाच्या मुर्तीवर मुकुट चढवण्याचा मान मिळणार असल्याचे समजले तेव्हा माझा क्षणभर विश्वासच बसला नाही. पण जेव्हा मी प्रत्यक्षात ते कार्य केलं, तेव्हा मला जाणीव झाली की भारत हा असाच असायला हवा. माझ्या संपूर्ण आयुष्यातली ही सर्वात अविस्मरणीय गोष्ट आहे. निंबूत गावाने जो मापदंड घालून दिला आहे, तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरेल.”
 
तौफिक सय्यद आणि त्यांच्या पत्नी परवीन सय्यद  

सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने नांदतात
निंबूतमध्ये केवळ मंदिर आणि मस्जिदचं शेजारी नाहीत, तर तिथे सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. रामनवमीच्या याप्रसंगी गावातील धनगर, माळी, गोसावी, वडारी आणि मुस्लिम समाजाच्या सात जोडप्यांना मूर्तींवर मुकुट चढवण्याचा मान देण्यात आला. 

या घटनेचे महत्त्व अधोरेखित करताना सतीश काकडे आवर्जून सांगतात की, २०१५ च्या डिसेंबरमध्ये जेव्हा या मंदिर आणि मशिदीचे उद्घाटन झाले, तेव्हा अजित पवार आणि नवाब मलिक एकाच व्यासपीठावर होते. एकाच दिवशी दोन्ही वास्तूंचे उद्घाटन होण्याची ही देशातील कदाचित पहिलीच घटना असावी. ते अभिमानाने सांगतात की, “काही लोक म्हणतात राम मंदिर चांगलं झालंय, काही म्हणतात मशीद चांगली झालीय. पण मला समाधान यात आहे की मी दोन्ही वास्तू समसमान बांधल्या आहेत.”
 
दिवंगत नेते अजित पवार यांच्या हस्ते मंदिर आणि मस्जिदचे एकाच वेळी उद्घाटन 

पुतळ्यांच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार
सतीश काकडे यांनी हा प्रवास केवळ धार्मिक स्थळांपुरता मर्यादित ठेवलेला नाही. येत्या सप्टेंबर महिन्यात ते गावात महापुरुषांचे पाच ब्रॉन्झचे पुतळे बसवणार आहेत. यात महात्मा जोतिबा फुले, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि दिवंगत नेते अजित पवार यांचा समावेश आहे. या महापुरुषांनी आयुष्यभर समतेचा आणि विज्ञानाचा विचार मांडला, तोच विचार निंबूतच्या तरुणाईमध्ये रुजवावा, हा त्यांचा मानस आहे.

निंबूत गावातील ही घटना समाजासाठी खरोखर आदर्शवत आहे. आजच्या काळात राजकारण माणसांना घराघरात विभागण्याचे काम करत असताना, निंबूतसारखी गावे देशाला समतेची दिशा दाखवण्याचे काम करतात. तौफीक सय्यद आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते चढवलेला रामाचा तो मुकुट भारतीय एकात्मतेचे प्रतीक बनला आहे.

महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. ज्ञानेश्वर-तुकाराम-नामदेवांनी नेहमीच समतेचा विचार मांडला. सतीश काकडे यांनी निंबूतमध्ये जो उपक्रम राबवला, तो याच संत विचारांचा वारसा आहे. भेदभाव नष्ट झाल्याशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही, हा संदेश निंबूतने जगाला दिला आहे. निंबूतचा हा 'राम-रहीम' पॅटर्न जर प्रत्येक गावात राबवला गेला, तरच महाराष्ट्रात वाढीस लागलेल्या धार्मिक विद्वेषाचा विखार कमी होईल आणि महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पुरोगामी होईल. 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter