बुडणाऱ्या शुभमला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणणारा फैसल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

अर्सला खान

उत्तर प्रदेशातील पीलीभीत येथून माणुसकीचे दर्शन घडवणारी आणि सोशल मीडियावर लाखो लोकांची मने जिंकणारी एक घटना समोर आली आहे. तलावात बुडणारी एक कार, त्यात अडकलेला एक तरुण आणि काठावर उभे राहून या थराराकडे केवळ तमाशा म्हणून पाहणारे लोक... पण याच गर्दीतून एका व्यक्तीने केवळ पुढे येण्याचे धाडस दाखवले नाही, तर माणुसकीचा असा काही परिचय दिला की आज संपूर्ण देश त्याला सलाम करत आहे.

या जिगरबाज तरुणाचे नाव आहे फैसल. तो तलावाजवळ आपल्या होडीतून मासे पकडण्याचे काम करत होता. या दुर्घटनेदरम्यान त्याची स्वतःची होडी उलटली आणि बुडाली, पण फैसलच्या हिंमतीला आणि जिद्दीला तडा गेला नाही. त्याने पाण्यात उडी घेतली आणि कारमध्ये अडकलेल्या शुभम नावाच्या तरुणाला अगदी योग्य वेळी बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. हा थरारक व्हिडिओ यूपीच्या पीलीभीत येथील गौहनिया तलावाचा आहे, जिथे दोन तरुणांनी (फैसल आणि त्याचा सहकारी) आपल्या प्राणांची बाजी लावून ड्रायव्हरला बाहेर काढले.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम आपल्या कारने गावाकडे परतत होता. अचानक त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट तलावात जाऊन पडली. बघता बघता काही मिनिटांतच कार पाण्यात बुडू लागली. आजूबाजूला उपस्थित असलेले लोक हा सर्व प्रकार पाहत होते, पण पाण्यात उतरून त्या तरुणाला वाचवण्याचे धाडस कुणीही दाखवले नाही.

तिथे उपस्थित असलेले लोक हे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात मग्न होते, जणू काही हा एखादा सिनेमाचा सीन किंवा सामान्य घटना आहे. पण फैसलने हे सर्व पाहिले आणि 'मागचा पुढचा कोणताही विचार न करता' त्याने तलावात उडी घेतली. पाण्याचा प्रवाह वेगवान होता, तरीही तो कारपर्यंत पोहोचला. त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो पूर्णपणे लॉक झाला होता. अखेर फैसलने कारची खिडकी तोडली आणि आत अडकलेल्या शुभमला बाहेर खेचून पाण्याच्या पृष्ठभागावर आणले.

या संपूर्ण प्रकारात फैसलचा जीवही धोक्यात होता. पाण्यात त्याची होडी बुडाली होती, बुडणाऱ्या कारमुळे पाण्याचा दाब प्रचंड वाढला होता आणि तलावाचा तळ अत्यंत निसरडा होता. पण त्याने हार मानली नाही. शुभम आणि फैसल सुरक्षित बाहेर येताच, तोपर्यंत बघ्याची भूमिका घेणारे लोक अचानक मदतीसाठी धावले. ग्रामस्थांनी शुभमला तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सांगितले की, 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती', कारण आणखी काही मिनिटांचा उशीर झाला असता तर शुभमचा जीव वाचवणे अशक्य झाले असते.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक फैसलच्या धाडसाचे आणि माणुसकीचे भरभरून कौतुक करत आहेत. एकीकडे लोक बघ्यांच्या असंवेदनशीलतेवर संताप व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे फैसलने 'जाती-धर्माच्या भिंती ओलांडून' दाखवलेल्या माणुसकीला सलाम करत आहेत. अनेक युजर्सनी लिहिले आहे की, कोणताही भेदभाव न करता संकटात धावून जाणारे असे लोकच समाजाची खरी ताकद आहेत.

स्थानिक प्रशासनानेही फैसलच्या शौर्याची दखल घेतली असून, त्याचा सन्मान करण्याची तयारी सुरू आहे. शुभमच्या कुटुंबीयांनी तर फैसलला साक्षात 'देवमाणूस' मानले आहे. त्यांनी भावना व्यक्त केल्या की, "जर फैसल वेळेवर पोहोचला नसता, तर आज आमचा मुलगा जिवंत नसता." ही घटना केवळ एका अपघाताची आणि बचावाची कहाणी नाही, तर 'माणुसकी अजूनही जिवंत आहे', याची साक्ष देणारी आहे.

जेव्हा इतर लोक केवळ प्रेक्षक बनून उभे होते, तेव्हा फैसलने ते केले जे एक सच्चा माणूसच करू शकतो. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्याचे प्राण वाचवणे. पीलीभीतची ही कहाणी आज संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी तर ठरलीच आहे पण हिंदू-मुस्लीम सौहार्दाचे उदाहरण म्हणून या घटनेचे विशेष कौतुक होत आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter