रमजाननिमित्त मालेगावच्या गांधी मार्केटमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी.
मुस्लीम बांधवांच्या रमजान पर्वाला मंगळवारपासून (ता. १२) सुरवात होत आहे. यावर्षी कडक उन्हात रमजानचे उपवास असणार आहेत. मुस्लीम बहुल असलेल्या शहरातील पूर्व भागात रमजान पर्वाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. दरम्यान रमजान पर्व सुरु होण्यापूर्वीच येथील गांधी मार्केटमध्ये कपडे खरेदीला सुरवात झाली आहे.
मुस्लीम बांधवांचा रमजान ईद सर्वात मोठा सण असतो. रमजान पर्वात हजारो जण महिनाभर उपवास (रोजा) करतात. यात महिला व लहान मुलांची संख्यादेखील लक्षणीय असते. ११ मार्चला चंद्रदर्शन झाल्यास १२ मार्चपासून रोजे सुरु होतील. रमजान काळात शहराची दिनचर्या बदलते.
रमजाननिमित्त येथे विविध भागात भरणाऱ्या विशेष बाजारात दुध, फळे, भाजीपाला, खाद्यपदार्थ यांची रेलचेल असते. येथील इकबाल डाबी, देवीचा मळा, मच्छी बाजार, इस्लामपुरा, सरदार चौक, आझादनगर, सलामताबाद, आयेशानगर, पवारवाडी, मोहम्मद अली रोड, भिक्कू चौक, चंदनपुरी गेट यासह विविध भागात विशेष बाजार भरणार आहेत. रमजान काळात फळांबरोबरच खजुराची मोठ्या प्रमाणावर विक्री होते.
तसेच रमजान पर्वात येथे २० पेक्षा अधिक ठिकाणी विशेष बाजार भरतात. या बाजारातील हातगाडीवरील दुकानांसाठी जागांचे आरक्षण आतापासूनच करण्यात आले आहे. रमजान काळात फळांची विक्रमी विक्री होते. या पाश्र्वभूमीवर फळ गुदामे यांची स्वच्छता केली जात आहे. (Latest Marathi News)
कपडे बाजार राहणार तेजीत
रमजान पर्वात कपडे, चप्पल, बुट यांच्या विक्रीतही लक्षणीय वाढ होते. रमजानच्या पाश्र्वभूमीवर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर मालाची साठवणूक करण्यास सुरवात केली आहे. रमजान पर्व सुरु झाल्यापासून आठवड्यानंतर बाजारात खरेदीची धूम सुरु होते. अखेरच्या टप्प्यात तयार कपड्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते.
मालेगावात अनेक ठिकाणी स्वस्त दरात कपडे व इतर वस्तू मिळतात. त्यामुळे कसमादे, जळगाव, कन्नड, अहमदनगर यासह विविध भागातील नागरिक येथे खरेदीसाठी येतात. काही जणांनी रमाजन पर्वा पूर्वीच गांधी मार्केट, अंजुमन चौक, किदवाई रोड आदी ठिकाणी खरेदीला सुरवात केली आहे. महिलांच्या कपड्यात गेल्या वर्षीपेक्षा पंचवीस ते तीस टक्क्यांनी किंमती वधारल्या आहे.