डॉ. पठाण
अल्फिया शेख
दिल्लीतल्या जंतरमंतरवर सध्या फूड डिलिव्हरी बॉईजची धावपळ सुरू आहे. कोणी देशाच्या दुसऱ्या कोपऱ्यात बसून जंतरमंतरचा पत्ता टाकून ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर करतोय, तर कोणी गरमागरम बर्गर मागवून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात सोपवतोय.
सध्या दिल्लीतील जंतरमंतरवर येथे नीट (NEET) व टीईटी (TET) पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी हे विद्यार्थी करत आहेत. या विद्यार्थ्यांना बळ देण्यासाठी देशभरातून मदतीचे हजारो हात पुढे येत आहेत. याच लढ्यात महाराष्ट्राची तुफानी ऊर्जा घेऊन एक डॉक्टर थेट रायगडहून दिल्लीत दाखल झालाय.
रायगड जिल्ह्यातील खोपोलीचे डॉक्टर पठाण यांनी जंतरमंतरवरील अहोरात्र चालणाऱ्या या आंदोलनात विद्यार्थ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवेचा दवाखानाच थाटला आहे.
दिल्लीतल्या उकाड्याने अंगाची लाहीलाही होतेय. दिवसभराच्या घोषणाबाजीने मुलांचे गळे सुकतात, कोणाला डिहायड्रेशनचा त्रास होतोय, तर कोणाला अचानक थंडी-तापाचा सामना करावा लागतोय. अशा वेळी डॉ. पठाण औषधांचे भलेमोठे बॉक्स घेऊन तिथे विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी उभे ठाकले आहेत.
आंदोलत सहभागी होण्याच्या आपल्या या निर्णयाबद्दल सांगताना डॉ. पठाण म्हणाले की, "मी रायगड जिल्ह्यातील खोपोलीहून इथं आलोय. खोपोलीत माझं स्वतःचं हॉस्पिटल आणि प्रॅक्टिस व्यवस्थित सुरू आहे. पण जेव्हा दिल्लीत हे आंदोलन सुरू झाल्याचं समजलं, तेव्हा मलाही यात खारीचा वाटा उचलावासा वाटला. इथं प्रचंड गर्मी असल्याने विद्यार्थ्यांना डिहायड्रेशन आणि इतर शारीरिक त्रास होऊ शकतात. म्हणूनच ओआरएस पावडर आणि प्रथमोपचाराची सर्व आवश्यक औषधं घेऊन मी इथं हजर झालोय."
दिल्लीत जाण्याची जिद्द इतकी तीव्र होती की सुरुवातीला निसर्गाने घातलेला खोळंबाही डॉ. पठाण यांना रोखू शकला नाही. मुसळधार पावसामुळे प्रवासाचा प्लॅन कोलमडला, काढलेले रेल्वे तिकीट वाया गेले. पण मनाने आधीच दिल्ली गाठलेल्या या डॉक्टरने माघार घेतली नाही.
डॉ. पठाण म्हणाले की, "आपल्या महाराष्ट्रातील मुलं दिल्लीत आंदोलनासाठी आली आहेत, हे पाहिल्यावर मला गप्प बसता आलं नाही. कधी एकदा दिल्लीला पोहोचतो असं मला झालं होतं. खरंतर मी ७ जुलैलाच निघणार होतो, पण मुसळधार पावसामुळे ते शक्य झालं नाही आणि माझं तिकीटही वाया गेलं. पण मी हार मानली नाही. आंदोलनाच्या चार-पाच दिवस आधी मी दिल्लीत पोहोचलो आणि सेवा सुरू केली."
दिल्लीचा भयंकर उकाडा, सततचे ऊन आणि जागेवर बसून राहण्यामुळे उद्भवणाऱ्या शारीरिक व्याधींवर डॉ. पठाण तात्काळ विद्यार्थ्यांना उपचार देत आहेत. ओआरएस पावडरचे पाकीट देण्यापासून ते प्राथमिक उपचारांची सर्व औषधे त्यांनी स्वतःच्या खर्चाने आणि प्रयत्नांनी तिथे उपलब्ध केली आहेत. देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करणे हे आपले कर्तव्य आहे, या विचाराने प्रेरित होऊन डॉ. पठाण आपले हॉस्पिटल सोडून दिल्लीत दाखल झाले आहेत.
लढ्याला मिळाला संजीवनीचा स्पर्श
जंतरमंतरवर एकीकडे विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा आवाज आहे, तर दुसरीकडे जनसामान्यांच्या प्रेमाचा महापूर आला आहे. पाण्याच्या बाटल्या, रेनकोट, ऑनलाईन जेवण ऑर्डर करून तर रायगडचे डॉ. पठाण यांच्यासारखे अवलिये स्वतः तिथे उपस्थित राहून मोफत वैद्यकीय सेवा देऊन विद्यार्थ्यांची ताकद वाढवत आहेत.
दिल्लीच्या रस्त्यावर सुरू असलेला हा लढा आता केवळ विद्यार्थ्यांपुरता उरलेला नाही. देशभरातील हजारो हातांची साथ त्यात सामील झाली आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांना मदतीची गरज आहे, तोपर्यंत डॉक्टर पठाण तिथेच ठिय्या मांडून राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.