Narendra Dabholkar Murder Case: दोषी सचिन अंदुरेला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, जन्मठेपेची शिक्षा निलंबित

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 5 h ago
दाभोलकर हत्या प्रकरण; दोषी सचिन अंदुरेच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
दाभोलकर हत्या प्रकरण; दोषी सचिन अंदुरेच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

 

मुंबई 

तर्कवादी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या २०१३ मधील हत्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेला सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने अंदुरे याचा जामीन अर्ज मंजूर करत त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. न्या. सारंग कोतवाल आणि न्या. रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

या प्रकरणाचा सविस्तर निकाल अद्याप उपलब्ध झालेला नाही. सचिन अंदुरे याच्यावर कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातही खटला सुरू असून, त्याला त्या प्रकरणात आधीच जामीन मिळाला असल्यामुळे आता त्याच्या तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मे २०२४ मध्ये सत्र न्यायालयाने दाभोलकर हत्या प्रकरणात अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, ज्याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.

काय होते प्रकरण?

२० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील मॉर्निंग वाक दरम्यान दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी ६७ वर्षीय नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडे आणि नंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आला होता. सत्र न्यायालयाने यापूर्वी अन्य तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती, तर अंदुरे आणि कळसकर यांना जन्मठेप सुनावली होती. आता उच्च न्यायालयाने अंदुरेच्या शिक्षेस स्थगिती दिली आहे.