भक्ती चाळक
आजच्या काळात सोशल मीडियाकडे फक्त करमणुकीचे साधन म्हणून पाहिले जाते, परंतु ते एक विचार मांडण्याचे एक प्रभावी माध्यम देखील आहे. याच माध्यमाचा वापर करून पुण्याची तनुजा मोहसिन संदे ही चुणचुणीत मुस्लिम तरुणी आपली एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. अनेकदा समाजात असा समज असतो की महाराष्ट्रातील मुस्लिम मराठी बोलत नाहीत, पण तनुजा यांनी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हा समज मोडीत काढला आहे. आपल्या व्हिडिओंमधून ही मुस्लिम तरुणी इस्लामिक पेहराव घालून पूर्णपणे अस्खलित मराठीत संवाद साधताना दिसतेय.
याविषयी त्या ठामपणे सांगतात, "अनेकांना वाटतं मुस्लिम लोक मराठी बोलत नाहीत. पण मी त्यांना सांगू इच्छिते की, मी महाराष्ट्रीयन मुस्लिम आहे आणि इथल्याच मातीत जन्मलेय. त्यामुळे भाषेचा अभिमान बाळगत मी माझे व्हिडिओ मराठीतच बनवण्याचा निर्णय घेतला. आणि माझे व्हिडिओ पाहणारा बहुतांश वर्ग मराठीच आहे. या माध्यमातून मी लोकांच्या मनात असलेल्या अनेक शंकांचे निरसन करते."
हीच बोलण्याची शैली आणि सोशल मीडियावरील सक्रियता त्यांच्या एका विशेष उपक्रमाचे निमित्त ठरली. तो उपक्रम म्हणजे 'रमझान ईदचा डब्बा'. टीव्हीवरच्या बातम्या आणि समाज माध्यमांवरील व्हिडिओंमुळे हिंदू-मुस्लिमांमध्ये केवळ वैमनस्य आहे असा समज पसरवला जातो. मात्र सामान्य माणसाच्या आयुष्यात डोकावून पाहिल्यास चित्र पूर्णपणे वेगळे दिसते. तनुजा यांनी आपल्या या उपक्रमाद्वारे याच वास्तवावर भाष्य केले आहे. राजकारण आणि न्यूज चॅनेलच्या पलीकडे जाऊन आपण आजही एक समाज म्हणून कसे एकत्र राहतो, याचे दर्शन त्यांनी आपल्या कृतीतून घडवले आहे.
तनुजा यांचे बालपण मुंबईतील दादर हिंदमाता येथील पोलीस लाईनमध्ये गेले. त्यांचे वडील रशीद शेख हे मुंबई पोलीस दलात सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) म्हणून कार्यरत होते. पोलीस लाईनमध्ये बालपण घालवताना त्यांना धर्माच्या नावाने कधीच कोणती अडचण जाणवली नसल्याचे त्या सांगतात. त्यांच्या पोलीस वसाहतीत एकमेव मुस्लिम घर असूनही त्यांनी होळी, दहीहंडी आणि शिमगा यांसारखे सर्व सण हिंदू बांधवांसोबत साजरे केले.
आजही पुण्यात राहताना त्या हाच वारसा जपतात. त्यांच्या सोसायटीमध्ये जैन, मारवाडी आणि अनेक हिंदू कुटुंबं राहतात. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन झाले की फराळाची पहिली प्लेट त्यांच्याकडे येते, त्यानंतरच शेजारी फराळ खातात. त्याचप्रमाणे ईदच्या दिवशी दुपारी १ वाजण्यापूर्वी तनुजा आपल्या हाताने ३० ते ३५ डबे शेजाऱ्यांना पोहोचवतात. त्यानंतरच त्यांचे कुटुंब जेवायला बसते.
'रमझान ईदचा डब्बा' मागची भावना
तनुजा संदे यांनी आपल्या रमझान ईदचा डब्बा या उपक्रमाची संकल्पना स्पष्ट केली. या व्हिडिओमागच्या भूमिकेबद्दल त्या म्हणतात, "समाजात धर्माच्या नावावर जे राजकारण चाललंय, त्यामुळे लोकांना हिंदू-मुस्लिम म्हणजे वैमनस्य निर्माण करणारी गोष्ट वाटते. पण प्रत्यक्षात मात्र असं काहीच नाहीये. आपण सगळे आजही एकत्र आहोत. मी जेव्हा हिंदू सणांमध्ये सहभागी होते, तेव्हा मला कधीच कुणी परकं मानलं नाही. सोशल मीडियावर दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी खऱ्या नसतात, आपण प्रत्यक्षात जे अनुभवतो ते सोशल मीडियाच्या जगापेक्षा खूप वेगळं असतं.”
त्या पुढे सांगतात की, "रमझानचे डबे देताना कोणावरही मांसाहारी जेवणाची सक्ती नसते. ज्यांना शाकाहारी जेवण हवे असते, त्यांना मी आवडीने शीरखुरमा देते. मुळात आमच्या शेजाऱ्यांना शीरखुरम्याची मोठी आतूरता असते. तुम्ही हा कसा बनवला? यामध्ये काय काय साहित्य टाकलंय? अशा प्रश्नांनी त्याची रेसिपी विचारली जाते. आणि ही रेसिपी सांगताना आणि गोडवा वाटताना मिळणारा आनंद शब्दांत मांडता येणारा नसतो."
सोशल मीडियावरील नकारात्मकतेवर अशी केली मात
ईदच्या दिवशी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकल्यानंतर त्यांना ९९% चांगला प्रतिसाद मिळाला, पण १% लोकांनी नकारात्मक कमेंट्स केल्या. यामुळे त्या काही काळ अस्वस्थ झाल्या होत्या. त्यांनी कमेंट सेक्शन बंद करण्याचा किंवा व्हिडिओ काढून टाकण्याचा विचार केला.
त्या सांगतात, "मी कमेंट सेक्शन बंद केल्यावर लोकांनी मला मेसेज करायला सुरुवात केली. त्यांनी विनंती केली की, ताई तुमचा व्हिडिओ खूप छान आहे, आम्हाला आमचे अनुभव सांगायचे आहेत, कमेंट्स सुरू करा." त्यानंतर तनुजा यांनी नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करून सकारात्मकतेला महत्त्व देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी आपल्या बालपणातील हिंदू-मुस्लिम मैत्रीच्या आठवणी देखील लिहिल्या.
मदतनीस मावशींच्या प्रश्नांमधून रमझान सिरीजला सुरुवात
तनुजा यांनी रमझान काळात व्हिडीओंची एक सिरीज सुरू केली. ही सिरीज सुरू करण्यामागे त्यांच्या घरातील मदतनीस मावशींनी विचारलेले प्रश्न कारणीभूत ठरले. त्या सांगतात, "मला तीन वर्षांचा लहान मुलगा आहे. मी महिनाभर रमझानचे उपवास करते तेव्हा आमच्या मदतनीस मावशी मला अनेक प्रश्न करतात. त्या हिंदू असल्याने त्यांना हे सगळे प्रश्न पडणे साहजिकच. त्यांना खूप उत्सुकता होती की तुम्ही आता उपवासात कसं बाळाला बघणार? तुम्ही पूर्ण दिवस उपाशी राहणार का? तुम्ही पाणी न पिता उपास कसा करता? चंद्र बघून उपास सोडता का? त्यांच्या अशा साध्या प्रश्नांमधून ही सिरीज बनवण्याची कल्पना सुचली." ही सिरीज त्यांनी पूर्णपणे मराठीत केली आणि लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
आयटी जॉब ते कंटेंट क्रिएटरपर्यंतचा प्रवास
तनुजा यांचे शिक्षण इंजिनिअरिंगमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी ५ वर्षे आयटी क्षेत्रात नोकरी केली. लॉकडाऊनच्या काळात त्यांचे लग्न झाले आणि त्यानंतर त्या संसारात व्यस्थ झाल्या आणि त्यांनी नोकरी सोडली. त्या सध्या पुण्यात त्यांचे आयटी इंजिनिअर असलेले पती मोहसिन संदे आणि त्यांचा ३ वर्षांचा मुलगा, अशा छोटाशा कुटुंबासोबत राहतात. त्यांचा भाऊ स्वतः एक मोठा कंटेंट क्रिएटर आहे. त्यानेच तनुजा यांना घरातून काहीतरी वेगळं करण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या या कंटेंट क्रिएशनच्या भूमिकेला कुटुंबाने पूर्णपणे पाठिंबा दिला. त्यांच्या कोणत्याही व्हिडिओला पहिली लाईक आणि कमेंट ही त्यांच्या वडिलांकडूनच येते, असे त्या सांगतात.
तनुजा संदे यांनी सोशल मीडिया वापरणाऱ्या तरुणांना खूप महत्त्वाचा संदेश दिला. "राजकारण हे फक्त ऑनलाईनच राहू द्या. टीव्हीवरचं राजकारण वेगळं आणि आपलं जगणं वेगळं. महाराष्ट्रामध्ये सर्वधर्मसमभाव पहिल्यापासून आहे आणि तो राहणारच. माझ्या वडिलांनी आम्हाला हीच शिकवण दिली आणि माझ्या मुलालाही मी याच संस्कारात मोठं करणार आहे. संकटाच्या वेळी मदत करणारा माणूस कोणत्या धर्माचा आहे, हे कधीच पाहिलं जात नाही. मग दैनंदिन जीवनात वावरताना या गोष्टींकडे का पाहिलं जातं? सर्वधर्मसमभाव ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती आपणच जपायला हवी," असे त्या शेवटी अभिमानाने सांगतात.