श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात एका दहशतवाद्याने केलेल्या गोळीबारात शहीद झालेले पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिक हुसेन कुरेशी यांच्या अंत्ययात्रेत बुधवारी हजारो नागरिक सहभागी झाले. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही शहीद जवानाला अश्रूूंच्या सुरात श्रद्धांजली अर्पण केली.
अमरनाथ यात्रा सुरक्षेच्या ड्युटीवर असताना हेड कॉन्स्टेबल कुरेशी यांच्यावर लाल चौक परिसरात दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा भ्याड हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने अनंतनाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हेड कॉन्स्टेबल कुरेशी हे जम्मू-काश्मीर पोलिसांच्या आयआरपी तिसऱ्या बटालियनमध्ये कार्यरत होते.
संध्याकाळी मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील बिरवाह येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार पार पडले. याप्रसंगी विशेष पोलीस महासंचालक जावेद गिलानी आणि उपआयुक्त अहर अमीन खान यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हजारो शोकाकुल नागरिकांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिव शरीराला अखेरचा निरोप देण्यात आला. दरम्यान, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैहरची संघटना असलेल्या 'द रेजिस्तान फ्रंट' (TRF) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.