मुस्लिमांनी स्त्रियांच्या दृष्टिकोनातून कुराण समजून घेण्याची गरज का आहे?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

डॉ. उझ्मा खातून

आज एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आपण कुराण थेट वाचतो की इतरांनी सांगितलेल्या अर्थाच्या माध्यमातून ते समजून घेतो? आपल्यापैकी बहुतेकांचा कुराणाशी थेट संबंध येत नाही. आपण त्याचे भाषांतर वाचतो, मौलवींचे प्रवचन ऐकतो किंवा विद्वानांनी केलेले निरुपण (तफसीर) वाचतो.

गंमत म्हणजे, गेल्या अनेक शतकांपासून हे निरुपण करणारे विद्वान प्रामुख्याने पुरुषच राहिले आहेत. त्यामुळे नकळतपणे कुराणाबद्दलची आपली समज ही पुरुषांच्या दृष्टिकोनातूनच तयार झाली आहे.

वास्तविक, कुराण हे संपूर्ण मानवजातीसाठी आहे. ते श्रद्धावान पुरुष आणि श्रद्धावान स्त्रिया या दोघांशीही संवाद साधते. कुराण वारंवार न्याय, दया आणि नैतिक जबाबदारीवर भर देते.

पण अडचण अशी झाली की, कुराणाचे निरुपण करण्याची परंपरा अशा काळात आणि समाजात विकसित झाली, जिथे धर्म, शिक्षण आणि कायद्याची सर्व सूत्रे पुरुषांच्या हातात होती.

या सामाजिक परिस्थितीचा परिणाम कुराणाच्या अर्थावर होणे साहजिकच होते. त्यामुळे अभ्यासाच्या या प्रक्रियेत स्त्रियांचे अनुभव आणि त्यांचे जगणे अनेकदा बाजूला पडले. हे काही कुराणामुळे झाले नाही, तर त्या काळातील समाज रचनेमुळे झाले.

इथे एक मूलभूत गोष्ट आपण पक्की लक्षात ठेवली पाहिजे. कुराण हे ईश्वरी लेणे (प्रकटीकरण) आहे, तर 'तफसीर' हा त्या ईश्वरी शब्दांना समजून घेण्याचा मानवी प्रयत्न आहे.

ईश्वराचे शब्द पवित्र असतात आणि ते बदलत नाहीत; पण त्याचा अर्थ लावण्याची पद्धत ही त्या त्या काळावर, भाषेवर आणि संस्कृतीवर अवलंबून असते.

जुन्या काळातील विद्वान नक्कीच ज्ञानी आणि प्रामाणिक होते, पण त्यांच्यावर त्यांच्या काळाचा प्रभाव होताच. त्यांच्या काही स्पष्टीकरणांमध्ये त्यावेळच्या पुरुषप्रधान समाजाची झलक दिसते.

देवाची वाणी आणि मानवी निरुपण यातील हा फरक मान्य केल्याने आपली श्रद्धा कमी होत नाही, तर उलट ती अधिक पक्की होते.

यामुळेच, कुराणाशी एकनिष्ठ राहूनही आपण जुन्या व्याख्यांचा पुन्हा विचार करू शकतो. जर अर्थ लावणे हे मानवी काम असेल, तर त्यात काळानुरूप बदल नक्कीच होऊ शकतो. यामुळेच स्त्रियांनाही या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळते.

कुराण स्वतः स्त्रियांना एक स्वतंत्र आणि नैतिक व्यक्तिमत्त्व मानते. बीबी मरियम (मेरी) यांचा उल्लेख 'निवडलेली आणि पवित्र' (३:४२-४३) असा आला आहे. शेबाची राणी (बिल्किस) एक हुशार आणि विचारी नेत्या म्हणून कुराणात समोर येते (२७:२३-४४).

कुराण अनेकदा श्रद्धावान पुरुष आणि स्त्रियांचा उल्लेख जबाबदारी आणि मोबदल्याच्या बाबतीत जोडीनेच करते (३३:३५). तसेच, चांगल्या कामात ते एकमेकांचे मित्र आणि सोबती असल्याचेही सांगते (९:७१). यावरून हेच सिद्ध होते की, देवाच्या नजरेत स्त्री आणि पुरुष समान आहेत.

पण दुर्दैवाने, स्त्रियांशी संबंधित चर्चा प्रामुख्याने लग्न, पडदा, वारसाहक्क आणि कौटुंबिक कायद्यांपुरतीच मर्यादित राहिली. नेतृत्व, सार्वजनिक सहभाग आणि सामाजिक न्याय यांसारखे मोठे विषय अनेकदा पुरुषांच्या नजरेतूनच पाहिले गेले. या मर्यादित विचारसरणीमुळे मुस्लिम समाजाची जडणघडण तशीच झाली आणि कधीकधी विषमतेला धर्माचा आधार मिळाला.

जेव्हा अर्थ लावण्याच्या पद्धतीत बदल होतो, तेव्हा सत्तेची समीकरणेही बदलतात. अलीकडच्या काळात अनेक अभ्यासू मुस्लिम महिलांनी कुराण वाचण्याची एक नवी आणि शिस्तबद्ध पद्धत आणली आहे.

ही पद्धत तीन गोष्टींवर आधारित आहे: पहिली म्हणजे, ती ओळ (आयत) कोणत्या संदर्भात आली आहे हे पाहणे. दुसरी, अरबी शब्दांचा मूळ अर्थ तपासणे. आणि तिसरी म्हणजे, कुराणाचा जो मूळ गाभा आहे — न्याय, दया आणि मानवी सन्मान — त्याच्या चौकटीत राहूनच अर्थ लावणे.

ही पद्धत जुन्या विद्वानांना नाकारत नाही, तर त्यांच्या कामाचे नव्याने आणि चिकित्सकपणे मूल्यमापन करते. आपण कुराण बदलत नाही आहोत, तर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या समजुती तपासून पाहत आहोत.

स्त्रियांच्या दृष्टिकोनाचे महत्त्व तेव्हा जास्त जाणवते, जेव्हा आपण कुराण ४:३४ सारख्या काहीशा वादग्रस्त ओळींकडे पाहतो. तिथे म्हटले आहे की, "पुरुष हे स्त्रियांवर 'कव्वामून' आहेत." या वाक्याचा अर्थ अनेकदा असा लावला गेला की पुरुषांचे स्त्रियांवर वर्चस्व आहे किंवा ते श्रेष्ठ आहेत.

काही जुन्या व्याख्यांनी तर 'दराबा' या शब्दाचा आधार घेऊन लग्नात शारीरिक शिस्तीलाही मुभा दिली. अशा अर्थांमुळे समाजात खूप खोलवर परिणाम झाले आहेत.

पण जेव्हा आपण बारकाईने आणि संदर्भासहित पाहतो, तेव्हा अर्थ बदलतो. 'कव्वामून' या शब्दाचा संबंध जबाबदारी, सांभाळ करणे आणि आधार देणे याच्याशी आहे. ही ओळ स्वतःच सांगते की, ही जबाबदारी आर्थिक कारणांमुळे आहे ("कारण ते त्यांच्या संपत्तीतून खर्च करतात").

सातव्या शतकातील अरब समाजात पुरुष हेच कमवते होते. कुराणाने त्यावेळच्या परिस्थितीनुसार हे विधान केले होते. याचा अर्थ 'पुरुष कायमस्वरूपी श्रेष्ठ आहेत' असा घेणे चुकीचे ठरेल. ही एक आर्थिक जबाबदारी होती, जन्माने मिळालेले श्रेष्ठत्व नाही.

त्याहीपुढे जाऊन, कुराणाचा विचार नेहमी एकसंधपणे केला पाहिजे. ४:३४ चा कोणताही अर्थ कुराणाच्या व्यापक नैतिक दृष्टीकोनाशी सुसंगत असायला हवा. कुराण वैवाहिक जीवनात प्रेम, दया आणि शांतीवर भर देते. "त्यांच्याशी (स्त्रियांशी) प्रेमाने वागा" (४:१९), असे ते स्पष्ट सांगते. तसेच ३०:२१ मध्ये लग्नाचे वर्णन 'शांतता, स्नेह आणि दया' असे केले आहे.

त्यामुळे वर्चस्व किंवा हिंसेचे समर्थन करणारी कोणतीही व्याख्या ही कुराणाच्या मूळ तत्त्वांच्या विरोधात जाते. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे उदाहरणही इथे महत्त्वाचे आहे. त्यांनी आपल्या पत्नींशी नेहमीच आदराने व्यवहार केला आणि कधीही त्यांच्यावर हात उगारला नाही.

त्यामुळे, जे अर्थ हिंसा करण्याला योग्य ठरवतात, त्यांच्याकडे शंकेनेच पाहिले पाहिजे. अशा ओळींचा नव्याने विचार करणे म्हणजे कुराण पुन्हा लिहिणे नव्हे. याचा अर्थ एवढाच की, देवाची वाणी काय आहे आणि माणसाने लावलेला अर्थ काय आहे, हे समजून घेणे.

मुस्लिम विद्वानांनी नेहमीच काळाला अनुसरून अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या काळातील विद्वान, ज्यात स्त्रियांचाही समावेश आहे, तेच काम पुढे नेत आहेत. इतिहासात स्त्रिया कधीच गायब नव्हत्या.

हजरत आयेशा (र.) या तर हदीस आणि कायद्याच्या बाबतीत मोठा अधिकार होत्या. पण नंतरच्या काळात संस्थात्मक पातळीवर धार्मिक अधिकार कमी होत गेले. हे इतिहासातील बदलांमुळे झाले, कुराणामुळे नाही.

अलीकडच्या काळात अमिना वदूद, अस्मा बर्लास आणि फातिमा मर्निसी यांसारख्या विद्वानांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. त्या म्हणतात की, 'पुरुषप्रधान विचार' आणि 'देवाची इच्छा' यात गल्लत करता कामा नये.

त्या या गोष्टीवर भर देतात की कुराण हे 'तौहीद'च्या (एकेश्वरवाद) तत्त्वावर उभे आहे. जर फक्त देवच सर्वोच्च असेल, तर कोणताही माणूस — मग तो पुरुष असो वा स्त्री — दुसऱ्यापेक्षा जन्माने श्रेष्ठ असूच शकत नाही. एका देवावर श्रद्धा असेल, तर नैतिक समानता ही आपोआपच येते.

काहींना वाटते की नवीन अर्थ हे मनमानी असू शकतात. पण तसे नाही. हा अभ्यास अरबी भाषेच्या ज्ञानावर आणि कुराणाच्या मूळ संदेशावर आधारलेला असतो. यात स्त्रियांचा आवाज जोडणे म्हणजे अभ्यासाला अधिक समृद्ध करणे होय.

आजच्या समाजासमोर अशी अनेक आव्हाने आहेत, जी पूर्वीच्या काळात वेगळ्या स्वरूपात होती; जसे की घरगुती हिंसाचार, स्त्रियांचे शिक्षण, त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य आणि नेतृत्व. या बदलत्या काळात कुराणाकडे नव्याने पाहणे गरजेचे आहे.

जर मुस्लिम समाजातील अर्ध्या भागाला (स्त्रियांना) या समजून घेण्याच्या प्रक्रियेतून बाहेर ठेवले, तर समाजाची बौद्धिक वाढ खुंटेल. कुराण प्रत्येकाला विचार करायला आणि बुद्धीचा वापर करायला सांगते. हे आवाहन केवळ पुरुषांसाठी नाही.

जर श्रद्धावान पुरुष आणि श्रद्धावान स्त्रिया नैतिक जबाबदारीत वाटेकरी असतील, तर त्यांनी अर्थ लावण्याच्या प्रक्रियेतही वाटेकरी असायला हवे. इस्लामिक इतिहासात प्रत्येक नव्या संदर्भाने नवी समज निर्माण केली आहे. परंपरेचा हा स्वभाव नेहमीच टिकून राहिला आहे.

कुराण स्वतः बदलत नाही, पण माणसाची समज काळाप्रमाणे प्रगल्भ होत जाते. अर्थ लावताना स्त्रियांचा सहभाग असणे म्हणजे परंपरा मोडणे नव्हे, तर ती जिवंत ठेवणे आहे. जेव्हा समाज स्त्री आणि पुरुष दोघांचेही म्हणणे ऐकतो, तेव्हा ईश्वरी संदेश अधिक स्पष्टपणे समजतो.

जर कुराण सर्वकाळासाठी मार्गदर्शक असेल, तर त्याच्या स्पष्टीकरणात सर्वांचा आवाज असला पाहिजे. सामायिक ज्ञान, नैतिक भान आणि ईश्वरासमोर नम्रता असेल, तरच कुराणातील न्याय आणि दयेचा संदेश आजच्या काळात पूर्णपणे उजळून निघेल.

(लेखिका अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या माजी प्राध्यापिका असून त्या लेखिका आणि सामाजिक विचारवंत आहेत.)


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter