आसान (दक्षिण कोरिया)
भारताची प्रतिभावान शटलार अस्मिता चालिहा हिने शानदार खेळाचे प्रदर्शन करत कोरिया मास्टर्स सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत पहिले BWF वर्ल्ड टूर विजेतेपद पटकावले आहे. रविवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत अस्मिताने चीनच्या चौथ्या मानांकित हान कियान शी हिचा पराभव करत हा ऐतिहासिक विजय मिळवला.
सुरुवातीला पहिला गेम गमावल्यानंतरही २६ वर्षीय अस्मिताने जिद्द सोडली नाही. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात तिने पुनरागमन करत जागतिक क्रमवारीत ३५ व्या स्थानी असलेल्या हान कियान शी चा १४-२१, २१-१४, २१-१४ असा पराभव केला. हा सामना ५३ मिनिटे चालला. या विजयानंतर बोलताना अस्मिताने आनंद व्यक्त केला असून, ही कामगिरी आपल्यासाठी अविश्वसनीय असल्याचे म्हटले आहे.
दोन वर्षांपूर्वी दक्षिण कोरियामध्येच अस्मिताला गुडघ्याच्या गंभीर दुखापतीचा सामना करावा लागला होता, ज्यामुळे तिच्या कारकिर्दीवर संकट आले होते. मात्र, कठोर परिश्रम आणि पुनर्वसनानंतर तिने जबरदस्त पुनरागमन केले. राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रात प्रशिक्षक पार्क ताए-सांग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या अस्मिताच्या या यशाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या आठवड्यात तानवी शर्माने तैपेई ओपन जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंचे हे सलग दुसरे BWF वर्ल्ड टूर विजेतेपद ठरले आहे.